शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व आज असते तर त्यांनी वडिलांच्या स्मारकास विरोध करणारे सरकारच पाडले असते, कार्यकर्त्यांनीही बाळासाहेबांची भाषा वापरली असती तरी एव्हाना शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभे राहिले असते, मात्र आजचे सेनेचे नेतृत्व आक्रमक नसल्यामुळे हे स्मारक रखडले आहे, अशी घणाघाती टीका करीत ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच जाहीर तोफ डागली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी होत असलेल्या आंदोलनाची धुरा उद्धव यांनीच हाती घेतली तर सर्वप्रथम आपण त्यांच्यासह असू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारीच भेट घेऊन स्वपक्षीयांना धक्का देणाऱ्या मनोहर जोशी यांनी उद्धव यांच्यावर प्रथमच जाहीर टीका करतानाच उद्धव आणि राज यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगून मनसेलाही झुकते माप दिल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे. निवडणुकीच्या राजकारणातून आपण एवढय़ात  निवृत्त होणार नसून पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या परंपरागत मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास उत्सुक असलेल्या मनोहर जोशी यांना उद्धव ठाकरे यांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे गेले काही दिवस ते अतिशय नाराज होते. त्यातच गुरुवारी त्यांनी पवार यांच्या भेटीचा मुहूर्तही साधला. हाती घेतलेला भगवा कधीच सोडणार नाही असे सांगत त्या भेटीने सुरू झालेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करणाऱ्या जोशी यांनी शनिवारी रात्री थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल करीत शिवसैनिकांमधील असंतोषाला वाट करून दिली.
दादर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळच्या कार्यक्रमात जोशी यांनी गेले वर्षभर रखडलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे निमित्त साधत उद्धव यांच्यावरच वार केला. एकीकडे उद्धव यांच्यावर बोचरी टीका करतानाच, मी नेतृत्वाला दोष देत नाही, आजचे नेतृत्वही  वेगळ्या प्रकारे शिवसेनेला पुढे नेत आहे, असे स्तुतीचे मलमही लावायला सर विसरले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray leadership is weak manohar joshi
Show comments