राष्ट्रवादी आणि मनसेने उभे केलेले आव्हान लक्षात घेता ‘ठाणे आणि शिवसेना’ हे समीकरण कायम राखण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वत:च गुरुवारी पुढाकार घ्यावा लागला. ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासाकरिता सामूहिक विकास योजना लागू करावी या मागणीसाठी ठाकरे हे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर पहिली सत्ता ठाण्यात मिळाली होती. ठाण्यावर शिवसेनेची गेली चार दशके भक्कम पकड राहिली असताना आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यावरील शिवसेनेची पकड ढिली होत गेली. आता तर राष्ट्रवादी आणि मनसेने आव्हान उभे केले आहे. गेल्या वेळी ठाण्यातील तिन्ही आमदार शिवसेनेचे निवडून आले होते. ठाणे लोकसभेची जागा जिंकण्याबरोबरच विधानसभेच्या तिन्ही जागा कायम राखण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना लक्ष घालावे लागले आहे.
ठाण्यातील अनधिकृत इमारतींच्या प्रश्नात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले. पुनर्वसन झाल्याशिवाय या इमारती पाडू नयेत ही मागणी पवार यांनी केली आणि सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. ठाण्यात राष्ट्रवादीसाठी ही बाब फायदेशीर ठरणार असतानाच सामूहिक विकास योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांना दिले होते. पुन्हा याचे श्रेय काँग्रेसला जाण्याची शिवसेनेला भीती आहे. यामुळेच ठाकरे हे शिवसेनेच्या आमदारांसह मुख्यमंत्री चव्हाण यांच्या भेटीला आले होते. ठाण्यातही इमारतींच्या पुनर्विकासाकरिता सामूहिक विकास योजना महिनाभरात लागू केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ठाण्यातील जटिल प्रश्न सुटावा म्हणूनच आपण मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.  उद्धव ठाकरे यांच्या भेटीपूर्वी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर आणि स्थायी समितीचे सभापती रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच ठाण्यातही सामूहिक विकास योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. केवळ श्रेयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते नाटकबाजी करीत असल्याचा आरोप पूर्णेकर यांनी केला. याच मुद्दय़ावर ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.