सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक करणाऱया ‘त्या’ सहा शिवसैनिकांपैकी पाच जणांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी शाईफेक करणाऱय़ा शिवसैनिकांचा यावेळी ‘मातोश्री’वर यथोचित सन्मान केला. कुलकर्णी यांच्यावर शाईफेक करून तुम्ही चांगले काम केले असून यापुढेही असेच काम करत राहा, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आमचे कौतुक केल्याचे ‘त्या’ सहा जणांपैकी एकाने सांगितले.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती. शिवसेनेने या कृतीचे समर्थन करतानाच सुधींद्र कुलकर्णी पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप केला. सेनेच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधींद्र कुलकर्णी यांनी आपण एजंट नक्कीच आहोत. पण पाकिस्तानचे एजंट नसून दोन्ही देशांमध्ये शांती राहावी, यासाठी कार्य करणारे एजंट आहोत, असे म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातूनही शाईफेक प्रकरणाचे समर्थन करण्यात आले असून कुलकर्णी यांची तुलना थेट दहशतवादी अजमल कसाबशी करण्यात आली.
दरम्यान, शिवसेनेच्या शाई-राड्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी सेनेचा विरोध मोडून कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सोमवारी कडेकोट बंदोबस्तात पार पाडला. कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने जे काही घडले, ते राज्याची बदनामी करणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या राडेबाजीवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली.
शाईफेक करणाऱया शिवसैनिकांचा सन्मान योग्यच– संजय राऊत
पाकिस्तानशी लढणाऱया सैनिकांना अशोकचक्र दिले जाते मग, पाकिस्तानचे एजंट असलेल्या सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक करणाऱया शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंनी कौतुक केले तर पोटात दुखण्याच कारण काय?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करून शाईफेक करणाऱया शिवसैनिकांच्या सन्मानाचे समर्थन केले.