मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. या नागरिकांविरोधात सरकारकडून पोलीस बळाचा वापर केला जात आहे. पोलिसांनी अनेकांना ताब्यातही घेतलं आहे. या प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा प्रकल्प चांगला आहे तर मग लोकांची डोकी फोडून का सांगत आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात चांगले प्रकल्प आणत आहोत, असं तुम्ही म्हणता मग पोलिसांच्या मदतीने तिथल्या माता भगिनींना फरपटून का नेता? लोकांना अटक का करता? आणि हा प्रकल्प तुमच्यासाठी चांगला आहे? असं का म्हणता. यावर आम्ही काही बोललं की, हे विकासाच्या आड येतात, असं सांगता. असं जर असेल तर वेदान्त फॉक्सकॉन किंवा टाटा एअरबससारखे प्रकल्प इकडे का आणले नाहीत? जे चांगले प्रकल्प इकडे येऊ शकत होते, ते प्रकल्प तिकडे का पाठवले?
“या प्रकल्पाबद्दल नेमकं सत्य काय आहे? हे लोकांना कळलंच पाहिजे. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे, असं म्हणता, पण ती ग्रीन रिफायनरी असेल तर नागरिकांना मारझोड का करत आहात? त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूजा झाली असेल तर जनतेच्या समोर जावं. बारसूतील संघर्ष वाढत असताना मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात जातात. शेतात स्ट्रॉबेरी किती लागली, ते पाहत बसतात,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं.
बारसू येथे प्रकल्प आणण्यासाठी मी स्वत: पत्र लिहिलं होतं, ते खरं आहे. पण उद्धव ठाकरेंचं तुम्ही इतकं ऐकत होतात, तर गद्दारी करून सरकार का पाडलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. बारसूबद्दल माझी जी भूमिका होती, ती स्थानिकांची भूमिका होती. स्थानिक लोकांच्या हिताचा प्रकल्प असेल तर नागरिकांवर जबरदस्ती का करता? पर्यावरणाला हानी करणारे प्रकल्प आपल्याकडे नकोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.