केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्यावर शिंदे गटातील आमदार सक्रिय झाले आहेत. आज ( २० फेब्रुवारी ) शिंदे गटातील आमदारांनी विधिमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. यानंतर बोलताना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांबाबत मोठं विधान केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत गोगावले म्हणाले की, “अधिवेशनातील उपस्थितीबाबत लवकरच व्हीप जारी करणार आहे. हा व्हीप सर्वांना लागू होतो, त्यातून कोणीही सुटणार नाही. शिवसेना नाव आणि चिन्ह यावर जे कोणी निवडून आले आहेत, मग ते ठाकरे असो किंवा शिंदे गट, सर्वांनाच हा व्हीप लागू होणार आहे. आम्ही चुकीचं काही करणार नाही,” असं भरत गोगावले यांनी सांगितलं.
हेही वाचा : “पिसाळलेल्या कुत्र्याला औषध देऊन…”, शिंदे गटाच्या आमदाराची संजय राऊतांवर घणाघाती टीका
याबाबत आता शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. ते शिवसेना भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. व्हीप लागू केल्यानंतर ठाकरे गटातील आमदार अपात्र होणार का? याबाबत उद्धव ठाकरे विचारण्यात आलं. ते म्हणाले, “आमदार अपात्र होऊ शकत नाही. कारण, निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला मान्यता दिली आहे. दोन गट आहेत, हे मान्य केलं आहे. त्यानुसार आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं आहे.”
“मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं, याचा निर्णय निवडणूक आयोग देऊ शकत नव्हतं. मात्र, आयोगाच्या या निर्णयाला आम्ही आव्हान दिलं आहे. त्या गटाला त्यांनी नाव आणि चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही,” अशी स्पष्टोक्ती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.