राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांच्या नेतृत्वात आज ( ३ नोव्हेंबर ) किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी आहेत,’ असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला.
उदयनराजेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनराजेचं धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितलं होतं की, भाजपातील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरुवात झाली आहे. तसेच, महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून दिला.
हेही वाचा : “संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका
“महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र आलं पाहिजे. आगामी काळात सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्याची गरज आहे. कारण, मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटत असेल, तर अभिमान आणि स्वाभिमानाची त्यांच्याकडून अपेक्षा न केलेली बरी,” असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केला आहे.
हेही वाचा : “सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर
सोलापूरमध्ये ‘कर्नाटक भवन’ बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. यावरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. “सीमावादाच्या प्रश्नावरून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री आक्रमक होत असतील, तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आमि त्यांचे आमदार गुवाहाटीला का जात नाहीत? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस करावा,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.