मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पातून जाहीर करण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ‘लाडकी बहीण’ योजनेबरोबरच भावाबहिणीत भेदभाव न करता ‘लाडका भाऊ’ योजनाही जाहीर करण्यात यावी, असे स्पष्ट केले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवालय पक्ष कार्यालयात ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफी आणि लाडका बहीण-भाऊ योजनेची मागणी करीत सरकारची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्रही सोडले.

हेही वाचा >>>महायुक्तीचा संकल्प! अजितदादांच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांचा हात; सर्व समाजघटकांसाठी घोषणांचा वर्षाव

या सरकारला आता निरोप देण्याची वेळ आली आहे, याचा पुनरुच्चार करीत ठाकरे म्हणाले, राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. पण आतापर्यंत एक हजार ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची भरपाई अद्याप दिलेली नाही. त्यामुळे हे सरकार केवळ गाजर दाखविणारे आहे. विविध प्रश्नांमुळे कांदा, दूध व अन्य उत्पादने घेणारा शेतकरी अडचणीत आला आहे. महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण कर्जमुक्ती योजना जाहीर करून त्याची अंमलबजावणीही केली. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप सुरू आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत मात्र करोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे आम्ही निर्णय घेऊ शकलो नव्हतो. पण आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्त करून मदतीचा हात द्यावा. विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिने असल्याने अर्थसंकल्पात कर्जमाफी योजना जाहीर करुन त्याची लगेच अंमलबजावणी करावी व निवडणुकीला सामोरे जावे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

महायुती सरकारने अडीच वर्षांत केवळ घोषणाच केल्या, पण त्याची अंमलबजावणी मात्र केली नाही. त्यामुळे यासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी ठाकरे यांनी केली. ही श्वेतपत्रिका कोरीच असेल, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. खोटा प्रचार केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. मात्र महाविकास आघाडीच्या काळात अनेक पेपर फुटीचे प्रकार झाले, हा त्यांचा अपप्रचार आहे किंवा त्यांनी तयार केलेले कथानक आहे. करोना काळात ऑनलाईन पेपर फुटीचे प्रकरण झाले होते व त्याची तात्काळ चौकशी करण्यात आली होती. पुण्यात व अन्यत्रही अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून याप्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने सर्वमान्य तोडगा काढावा व आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.