मुंबई : स्वा. सावरकरांचा सातत्याने अवमान करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निषेध करणार की स्वागताला जाऊन समर्थन देणार, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. राहुल गांधी यांना देशाचा आणि काँग्रेसचाही इतिहास माहीत नसल्याने ते सावरकरांविषयी बेताल वक्तव्ये करीत आहेत, अशी टीका करीत त्यांचा निषेध केला. राज्य सरकारला शंभर दिवस शनिवारी झाले. या काळात अनेक कामे व निर्णय आम्ही घेतले. पण ही केवळ  झलक  असून पुढील काळात अनेक जनहिताचे निर्णय होतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याचा निषेध  करीत फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांना इंग्रजांकडून पैसे घेणारे व हस्तक असे संबोधले. राहुल गांधी यांच्या  भारत जोडो  यात्रेला जनतेचा फारसा प्रतिसाद नसल्याने बेताल वक्तव्ये करून वाद निर्माण करायचा व लक्ष वेधून घ्यायचे, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे महान देशभक्त स्वा. सावरकर यांच्यावर त्यांनी टीका केली. स्वा. सावरकर यांच्याविषयी देशातील जनतेला अतिशय आदर आहे. तरीही स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत जाणीवपूर्वक वीर सावरकरांना अपमानित करण्यात आले. आम्ही सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करतो. पण, ब्रिटिश राजवटीत अंदमान कारागृहात काळय़ा पाण्याची शिक्षा व हालअपेष्टा भोगलेले स्वातंत्र्यसैनिक फार थोडे आहेत. वीर सावरकरांनी अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली.

माजी गुप्तवार्ता प्रमुख रश्मी शुक्लाप्रकरणी तपास बंद करण्याबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पोलीस अहवालाबाबत फडणवीस म्हणाले की, कोणताही अहवाल पुराव्यांच्या आधारावर सादर होतो. तत्कालीन पोलीस आयुक्त आणि  महासंचालक संजय पांडे यांना हाताशी धरून कुभांड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढील काळात येणार आहेत. पोलीस पुराव्यांच्या आधारावर काम करतात आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय देते. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर अन्याय करणार नाही किंवा  अकारण अन्याय होऊ देणार नाही.

 नाशिकचा अपघात दुर्दैवी 

नाशिकचा अपघात अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकार आपत्तीग्रस्तांना संपूर्ण मदत करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघाताची चौकशी केली जाणार असून असे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय व्यावसायिक पक्ष असून त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेला कमकुवत केले. नंतर तो पक्ष फुटण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आणि आता ती रिक्त जागा प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, हिंदूत्त्वाला मानणारे जे मतदार आहेत, त्यांच्या सिद्धांतांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने काम करीत असल्याने ती रिक्त जागा भरून काढता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray prohibition rahul gandhi insulted savarkar question by devendra fadnavis ysh