मुंबई : भारतरत्न देण्याचा अधिकार पंतप्रधांनाना आहे. नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे पंतप्रधान पदी आहेत. त्यांनी सावरकरांना अद्याप भारतरत्न का दिला नाही ? असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान टिकेल की नाही, अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे, असेही ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ठाकरे परिवार, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि शिवसैनिक आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधला.स्वातंत्र्यवीर सावकार यांच्याविषयी अत्यंत आदर आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत मी सहमत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतिव प्रेम, आदर, निष्ठा आहेच. स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंध नाही, त्यांनी याविषयी बोलू नये. वंदे मातरम, भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या मेहेबुबा मुफ्ती यांच्याशी युती चालते का ? असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काँग्रेस आणि आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या मातृसंस्थेचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगावे आणि मगच आम्हाला बोलावे. भाजपने आम्हाला देशभक्ती शिकवू नये. आरएसएसला आता शंभर वर्षे पूर्ण होतील. पण या संघाचेही स्वातंत्र्यसंग्रमात काहीच योगदान नव्हते. ते स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी बोलूच नये, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.