शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी एल्गार केला. असून ‘हर हिंदूू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा दिली आहे. ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरच्या अयोध्या मोहिमेसाठी जय्यत तयारी केली असून महिला व युवासेनेव्यतिरिक्त अन्य शिवसेना कार्यकर्त्यांना अयोध्येत दाखल होण्याचे आवाहन केले आहे.
ठाकरे यांनी अयोध्या मोहिमेच्या तयारीसाठी शिवसेनेचे विभागप्रमुख, उपनेते, नेते, आमदार-खासदार, मंत्र्यांची बैठक रविवारी शिवसेना भवनमध्ये घेतली. भाजपने आतापर्यंत राम मंदिराच्या व हिंदुत्वाच्या मुद्दय़ाचे राजकारणच केले. केंद्रात व उत्तर प्रदेशमध्ये संपूर्ण बहुमत असतानाही गेल्या चार वर्षांत राम मंदिरासाठी पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे राम मंदिर हा भाजपसाठी केवळ ‘चुनावी जुमला’ (निवडणुकीचा मुद्दा) होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, मग शिवसेना मंदिराची उभारणी करेल किंवा राम मंदिरासाठी वादग्रस्त जागा मंदिर निर्माण न्यासाकडे सुपूर्द करावी, हा इशारा अयोध्या मोहिमेत ठाकरे देणार आहेत.
ठाकरे २४ नोव्हेंबरला अयोध्येत पोचणार असून त्यादिवशी सायंकाळी शरयूतीरी महाआरती करतील. त्याचवेळी देशभरात राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी सायंकाळी महाआरती करावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार-खासदार अयोध्येला जाणार असून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत फलक लावले आहेत. मुंबईत व राज्यभरातही केंद्र सरकारविरोधात व राम मंदिराच्या मागणीसाठी फलकयुद्ध होत असून समाज माध्यमावरूनही आक्रमक प्रचार केला जाणार असल्याचे शिवसेना नेत्याने सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपला इशारा देण्यासाठी आता आधी मंदिर उभारणी सुरू करावी आणि मग निवडणुकीत हिंदू जनतेकडे मत मागायला यावे, यासाठी ‘पहले मंदिर फिर सरकार’, ही घोषणा देण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.