मुंबई : समाजवादी आणि शिवसेना या दोघांची ताकद मोठी असून विचार व मजबूत संघटना असताना डर कशाला? आपण या विघ्नसंतोषींना हरवू शकतो आणि देशातील लोकशाही वाचवू शकतो, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी समाजवादी संघटनांच्या बैठकीत रविवारी केले.
हेही वाचा >>> देशभर भाजपविरोधात वातावरण; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन
‘जनता दल संयुक्त’चे आमदार कपिल पाटील यांनी रविवारी वांद्रे येथे आयोजित केलेल्या समाजवादी जनता परिवार बैठकीत ठाकरे बोलत होते. या बैठकीला राज्यातील २१ हून अधिक समाजवादी जनता परिवारातील संघटना तसेच ‘आरजेडी’ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेतेही उपस्थित होते. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आरोग्य सेनेचे डॉ. अभिजीत वैद्य, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, जदयू महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव, मुस्लीम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, जेडीएसचे प्रभाकर नारकर, आरजेडीचे विजय खंदारे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आणीबाणी विरोधी संघर्ष यात समाजवादी आघाडीवर होते. यात ‘रा.स्व. संघ’ कुठे होता? फोडाफोडी करण्यात मात्र संघाचा हात असतो. अगदी आणीबाणीनंतर जे सरकार स्थापन झाले, त्यातही दुहेरी मुद्दय़ावर जनसंघाच्या नेत्यांनी गडबड केली. हे विघ्नसंतोषी आहेत. बिहारमध्ये लालू आणि नितीश कुमार यांच्यात यांनी बिघाडी केली. महाराष्ट्रात युती तोडण्यात हेच पुढे होते. म्हणूनच यांच्यापासून अंतर ठेवा. दुसऱ्या कोणाला मोठे होऊ द्यायचे नाही, ही भाजपची वृत्ती आहे, असा आरोप उद्धव यांनी केला.