शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेकडे टाळीसाठी हात पुढे केला होता. उद्धव यांची भूमिका प्रमाण मानून महायुतीतील भाजप व रिपाईच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना ‘दार उघड’ असे साकडे घालायला सुरुवात केली आणि उद्धव यांचे ‘राजकीय गणित’ चुकू लागले. यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून राज यांना ‘डोळे मारणारे’ भाजप नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांना सज्जड दम दिला. कालपर्यंत टाळी मागणाऱ्या शिवसेनेच्या या घुमजावमुळे भाजप-रिपाइंचे नेते संभ्रमात पडले आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक या शहरांमध्ये मनसेमुळे मराठी मते फुटल्याचा आरोप सेनेने सुरुवातीला केला. त्यानंतर मराठी मते पुन्हा शिवसेनेकडे वळतील यासाठी प्रयत्न केले. यातूनच टाळीसाठी हात पुढे करण्याचा प्रयोग झाला. मात्र सेनेच्या चाणक्यांची चाल भाजप-रिपाइ नेत्यांच्या लक्षात आली नाही आणि त्यांनी मनसेला महायुतीत सामील करून घेण्यासाठी ‘टाळी-मृदुंगाचे चाटे क्लासेस’ सुरु केले. भाजप-रिपाइंचे नेते हे राज यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद व मनसेला मिळालेल्या मतांच्या गणितात अडकली. यातूनच मनसेशिवाय सत्तेचा सोपान चढता येणार नाही हा दृढ विश्वास गडकरी-मुंडे यांच्यामध्ये निर्माण झाला तर पाठच्या दारानेच संसदेत प्रवेश मिळू शकतो हे लक्षात आल्यामुळे आठवले यांनीही महायुतीचा दरवाजा राज यांच्यासाठी उघडण्याची तयारी दाखवली. यासाऱ्यात मनसे हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा हस्तक असल्याचे दाखविण्याचा शिवसेनेच्या चाणक्यांचा ‘टाळी प्रयोग’ संपूर्णपणे फसला. यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून महायुतीच्याच ‘भागिदारां’वर तोफ डागली. महायुतीमध्ये मांडव कोणाचा, यजमान कोण आणि नक्की स्वयंवर कोणाचे असा सवाल उपस्थित करण्यात आला. चौथ्या सहकाऱ्यासाठी महायुतीचे दरवाजे किलकिले करून ‘शुक शुक’ असे इशारे करण्याची योजना हा ‘फु बाई फु’चा विनोदी प्रयोग बनल्याचे म्हटले आहे. लोकांना काँग्रेसचा पराभव करायचा आहे परंतु जनतेला राज्यात बेचव खिचडी नको असे सांगून यापुढे राज यांना शिट्टी, टाळी व शुक शुक करणे बंद करा, असा थेट इशारा शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप व रिपाईच्या नेत्यांना देण्यात आला आहे.
ठाकरेबंधुंना एकत्र आणण्याचा विडा उचलणाऱ्या नितीन गडकरी यांना विडा रंगविण्यासाठी काय काय लागते याची कल्पना आहे का आणि एखाद्या नशेबाजाने विडय़ात तंबाखू-गुटखा मिसळला तर विडेकरी गरगरून पडतील आणि युतीला त्याचा फटका बसेल असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. पंगतीचे आमंत्रण मित्रांनी द्यायचे व पाहुण्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिग’सह सगळी व्यवस्था शिवसेनेने करायची, अश धर्मादाय कार्यक्रमात शिवसेनेला काहीही रस नसल्याची भूमिका मांडल्यामुळे टाळी मागणाऱ्या शिवसेनेवर आता ‘टाळाटाळी’ची पाळी आल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजप,रिपाइं नेत्यांना इशारा
लोकांना काँग्रेसचा पराभव करायचा आहे, परंतु जनतेला राज्यात बेचव खिचडी नको असे सांगून यापुढे राज यांना शिट्टी, टाळी व शुक शुक करणे बंद करा, असा थेट इशारा शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप व रिपाईच्या नेत्यांना देण्यात आला आहे.