लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षाची पडझड रोखण्यासाठी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरसावले आहेत. कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांची मनधरणी करण्यापासून सुरू झालेले बैठकांचे सत्र आता कायम ठेवण्यात आले असून, दर मंगळवारी ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक घेण्याचे ठरले आहे. त्याचबरोबर पक्षबांधणीसाठी एक कार्यक्रम ठरविण्यात येत असून त्यानुसार स्वत: ठाकरे राज्यभर दौरा करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीतील अपयश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटाकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, अनंत गीते, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, अंबादास दानवे, राजन विचारे, सुनील प्रभू आदी नेत्यांनाही राज्यात फिरण्याचे व पक्षसंघटन मजबूत करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास शरद पवार, अजित पवारांचा विरोध होता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेते पदी निवडले होते. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार होते. मात्र भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यावेळी महाविकास आघाडी स्थापन झाली. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध केला होता. शिंदे हे तुलनेने कनिष्ठ असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आमचे नेते काम करणार नाहीत, अशी भूमिका पवार यांनी घेतली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला असता, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. शिंदेंना सध्या आत्मचिंतनाची गरज आहे. कामाख्या मंदिर किंवा आणखी कुठे जायचे असेल तिथे त्यांनी जावे आणि आपण मूळ शिवसेनेबाबत जी विधाने करीत आहोत, त्यात किती तथ्य आणि सत्य आहे, याचे आत्मचिंतन करावे, अशी टीका राऊत यांनी केली. भाजपबरोबरची युती आणि महाविकास आघाडीच्याही प्रत्येक निर्णयात शिंदे सहभागी होते. हा सामुदायिक निर्णय होता. महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन करावे लागेल, ही एकनाथ शिंदेचीही भूमिका होती. शिंदे या सगळ्या निर्णयांमध्ये आमच्या सोबत हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यांचे लक्ष फक्त त्यांना कोणते खाते मिळतेय यावर होते, अशी टीका राऊत यांनी केली.