महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये.स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितले पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचारप्रकरणात आपल्या कार्यकर्ताही असला तरी त्याला दयामाया दाखवू नये. तुमचे सरकार म्हणून आम्ही ओरडतो आणि आमचे सरकार म्हणून तुम्ही ओरडणार असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचाराविरोधात काम केले पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
शिवसेनेच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे झाले. शिवसेनेचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार रवीन्द्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे, उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्यकारी अधिकारी सुप्रिया घोटाळे, पुणे शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, अश्विनी शिंदे, कौस्तुभ खांडेकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
विधिमंडळातील कामकाजावेळी चुकीचे वागणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांना फटकारल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांचे कौतुक केले. नीलमताई काल परवा तुम्ही सभागृहाची उंची राखली. तुम्ही मंत्र्यांना खडसावून सांगितले, त्याबद्दल धन्यवाद. तो कोण होता म्हणून नाही तर आपण जिथे बसलो, ज्या पदावर बसलो. त्याला न्याय देताना आपण कुठे आलो आहोत याचे भान राहिले पाहिजे. या सभागृहाचे पावित्र्य कसे राखले पाहिजे हे तुम्ही दाखवून दिले. उद्या कोणताही मुख्यमंत्री कसाही वागला तर त्यांची कानउघडणी केलीच पाहिजे आणि ते तुम्हाला करावे लागणार, अशा शब्दांत सभागृहातील बेशिस्तीवर ठाकरे यांनी टीका केली.
नीलम गोऱ्हे यांच्या कार्याचेही कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्यावर, तिथे जाऊन कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना आधार देण्याच काम नीलमताई यांनी आजपर्यंत केले आहे. मी नीलमताईंना सांगण्याआधी साहेब मी घटनेच्या ठिकाणी आहे. हे आजवर मी अनेकदा पाहिले असून क्वचित अशी वृत्ती पाहण्यास मिळते.
महिला कार्यकर्ता ते विधान परिषद उपसभापती पदापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता : डॉ.नीलम गोऱ्हे
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आजवर मला ज्या जबाबदार्या दिल्या. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. महिला कार्यकर्ता ते विधान परिषद उपसभापतीपदापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिक यांनी साथ दिल्याने इथवर पोहोचू शकले आहे. त्या दरम्यान अनेक भूमिका पार पाडता आल्या आणि आज विधान परिषदेच्या कामकाजाबद्दल कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत असल्याचा मला आनंद आहे. तसेच आता यापुढील काळातही समाज प्रबोधन व वैधानिक काम वाढविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिली.