दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीएचा) पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांना पाठिंबा दिला असला, तरी पक्षाचे सध्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्व घटक पक्षांशी चर्चा करून लवकरात लवकर एखाद्या नावावर शिक्कामोर्तब करावे, असे सुचविले आहे. सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या अंतिम भागात उद्धव ठाकरे यांनी याविषयावर भाष्य केले.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी द्यावी, यासाठी भाजपमधील काही नेते दबाव टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांचे नाव जाहीर केले म्हणून त्याच नावाला शिवसेना चिटकून राहणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतून स्पष्ट झाले आहे.
भाजपमध्ये पंतप्रधान पदासाठी किती उमेदवार आहेत, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांना वाटते. एनडीएतील घटक पक्षांचा संवाद अधिक घट्ट व्हायला पाहिजे. एनडीएतील को ऑर्डिनेटरने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत त्यांनी नोंदविले. लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार आहेत. त्यावेळी पंतप्रधान पदाचा उमेदवार देणे भाग पडणार असेल, तर आतापासून चर्चा करायला सुरुवात केली पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन नाव ठरवायला काय हरकत आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीये.

Story img Loader