मुंबई : निवडणुकीच्या काळात ‘लाडक्या बहिणीं’च्या मतासाठी दीड हजारांची मदत देऊ केली. आता त्यातील पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवले जात आहे. जर या लाडक्या बहिणींनी विजय मिळवून दिला असेल, तर आता त्यांना फसवून घेतलेली मते परत घेणार का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारच्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या धोरणावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका झाल्यावर लाडक्या बहिणींना धक्का देण्यात आला. पाच लाख बहिणींना अपात्र ठरवले जात आहे. आता कुठे गेले तीन-तीन भाऊ? देवाभाऊ, जॅकेटभाऊ, दाढीभाऊ, असा सवाल त्यांनी केला. लाडक्या बहिणी हुशार आहेत, त्यांना कोण फसवा आहे आणि कोण खरा आहे, हे कळते. पण तरी या लाडक्या बहिणींनी जर यांना मतदान केले असेल तर त्यांना फसवून घेतलेली मते परत करणार का, असा सवाल करताना आता या बहिणींनीच याला वाचा फोडायला हवी, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
‘शिवसैनिक फोडून दाखवा’
खिचडी घोटाळ्याच्या आरोपात जामिनावर सुटका झालेले शिवसेना सचिव सूरज चव्हाण हे या व्यासपीठावर होते. सूरज चव्हाण हा एक साधा शिवसैनिक आहे. तो झुकू शकला असता, भाजपमध्ये जाऊ शकला असता, मिंध्यांकडे गेला असता. पण ज्याच्या हाता शिवबंधन आहे तो शिवसैनिक कधीही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. सगळेच तुमचे गुलाम होऊ शकत नाहीत. गुलामी महाराष्ट्राच्या रक्तात नाही. खासदार फोडायला निघाले, पण एकही शिवसैनिक आता फुटणार नाही. आता शिवसैनिकांची सहनशक्ती पाहू नका. तुमची डोक फुटतील, पण शिवसैनिक फुटणार नाही. हिंमत असेल, मर्द असाल तर ईडी सीबाआय बाजूूला ठेवून शिवसैनिक फोडून दाखवा, असे आव्हान त्यांनी शिंदे गटाला दिले.
‘रुपयाही बुडतोय, त्याकडे लक्ष द्या’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगास्नानावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रेनकोट घालून आंघोळ करतात, अशी टीका भाजपवाले करायचे. मात्र आता बुलेटप्रूफ जॅकेट घालून गंगास्नान केले जात आहे. पण गंगेत डुबकी मारताना आपला रुपयाही डुबतोय याकडेही लक्ष द्या, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबई अदानीला आंदण…
मुंबई महापालिकेतील ठेवींवरूनही उद्धव यांनी शिंदे गटावर टीका केली. मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवी होत्या. त्या आता ८० हजार कोटींवर आणल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवीतूनच ‘कोस्टल रोड’सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभा राहिला आहे. केंद्राकडे हात पसरावा लागला नाही. आता मुंबई अदानीला आंदण द्यायला निघाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.