भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA या नावाने नवी आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या सध्या चर्चेच्या फेऱ्या चालू असून जागावाटप, समन्वयाचे मुद्दे वगैरे चर्चा पातळीवर असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाकडून मात्र या आघाडीवर टीका केली जात आहे. आघाडीच्या नावावरून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्लाबोल केल्यानंतर आता विरोधकांकडून त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे.
रविवारी संध्याकाळी मुंबईत ठाकरे गट व संभाजी ब्रिगेड यांचा संयुक्त मेळावा झाला. या मेळाव्यासमोर केलेल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. यावेळी त्यांनी भाजपातील ‘आयारामां’वरही टीका केली.
“भाजपात राम नाही, आयाराम राहिलेत”
“आता भाजपात राम राहिलेला नाही. जे राहिलेत, ते आयाराम राहिले आहेत. राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयाराम मंदीर बांधलंय त्याचं काय. त्यांचं मंदिर बांधून भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना त्या आयारामांचा पूजा करावी लागते यासारखं कोणतं दुर्दैवं असू शकत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
‘इंडिया’ नावावरील टीकेवर मांडली भूमिका
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या आघाडीच्या इंडिया नावावरील टीकेवर भूमिका मांडली. “इंडिया.. होय आम्ही विरोधी पक्ष आहोत. जे लोकशाहीचा गळा दाबत आहेत, त्यांचे विरोधी पक्ष आम्ही आहोत. भारत मातेला पुन्हा गुलाम बनवू इच्छितात त्यांचे विरोधी आम्ही राहणारच. इंडियाची बैठक ३१ आणि १ तारखेला होतेय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मला बिचाऱ्या देवेंद्रजींची…”, थेट गाढवाशी तुलना करत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पाहा उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण…
“विदेशात तुमची ओळख…”
‘इंडिया’वर मोदींनी टिप्पणी केली. माणसं किती आत्ममग्न असू शकतात. म्हणे इंडिया म्हणजे इंडियन मुजाहिद्दीन का? व्वा. भारतमाता, इंडिया, हिंदुस्तान ही आमच्या देशाची नावं आहेत. मला मोदीजींना प्रश्न विचारायचाय की तुम्ही परदेशात जाता, बायडनला मिठ्या मारता, नेत्यांशी हस्तांदोलन करता, अभिमान वाटतो आम्हाला. आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख केली जाते की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. मग तेव्हा तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून तिकडे जाता की इंडियन मुजाहिद्दीनचे पंतप्रधान म्हणून तिकडे जाता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.