Uddhav Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण समोरासमोर भेटत आहोत. आजपर्यंत २३ जानेवारीचा दिवस म्हणजेच बाळासाहेबांचा जन्म दिवस हा आपण षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा करत होतो पण दोन महिन्यांपूर्वी निवडणुकांचा जो काही निकाल लागला, मला तो पटलेला नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच मधे अब्दाली येऊन गेले, कोण तुम्हाला माहीत आहे अमित शाह. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला विजय उद्धव ठाकरेंना जागा दाखवणारा आहे. जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय असतो ते तुम्हाला भविष्यात दिसेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त आयोजित मेळाव्यातून अमित शाह यांना उत्तर दिलं आहे.
अमित शाह, मराठी माणसाच्या नादी लागू नका-उद्धव ठाकरे
मराठी माणसाच्या नादी लागू नका, जिथे औरंगजेबाला या महाराष्ट्राने झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती? मी मुद्दाम जाहीर सभा घेतली. कारण म्हटलं कळू तरी द्या की माझ्याबरोबर किती लोक राहिले आहेत? अमित शाह तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. कारण माझी जागा ठरवणारी बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ही माझी शिवसैनिकांची संपत्ती आहे. जे शिवसेनाप्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक तोपर्यंत शिवसेनाप्रमुख आहे, तेच मी सांगतो आहे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी तुमचा पक्ष प्रमुख आहे. गद्दारांनी वार केले तर हा उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली.
त्या क्षणी मी माझं पक्षप्रमुख पद सोडेन-उद्धव ठाकरे
ज्यादिवशी माझा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल की उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत त्याक्षणी मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या परिवारातला महाराष्ट्र, निर्दयीपणे माझ्याशी वागणार नाही. हार-जीत होत असते. पण मूळात हा विजय भाजपाच्या अनेक लोकांना पचलेला नाही. काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे, ईव्हीएमचा तर नक्कीच आहे. ज्या अमित शाह यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरुन अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार लादलं ते असातसा महाराष्ट्र सुटू देतील?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मोदींच्या अश्वमेधाचं गाढव महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत अडवलं-उद्धव ठाकरे
“मोदींच्या अश्वमेधाचं गाढव महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत अडवलं. तो फटका अजूनही त्यांच्या वर्मी बसला आहे. त्या घावातून ते सावरलेले नाहीत. त्यांना पक्कं माहीत होतं की महाराष्ट्र गेला तर दिल्ली कोलमडणार आहे. जर महाराष्ट्रातला निकाल आपल्या मनातला लागला असता तर दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं दिसलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मालेगावात परत येत आहेत अमित शाह. त्यामुळे मी समाचार घेणारच. अफझल खानाचा पोवाडा ऐकला असेल. मिठी मारली तर प्रेमाने मारु पण पाठीत वार केला तर वाघनखं काढू. शरद पवारांनी दगाबाजी केली त्यांना २० फूट जमिनीत गाडलं आहे असंही अमित शाह म्हणाले. पण त्यांना कल्पना नसेल की जी दगाबाजी अमित शाह म्हणत आहेत त्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये भाजपाचे हशू आडवाणी नावाचे गृहस्थ मंत्री होते.” असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “दगाबाजीची बीजं ही तुमच्यात आहेत आमच्यात नाही, आम्ही तुमचा दगाबाजीचा इतिहास काढला तर श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल. महाराष्ट्र कधी कुणाशी दगाबाजी करु शकत नाही” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.