मुंबई : केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे. आक्रोश मोर्चे निघत आहेत. हिंदूंची फसगत झाली आहे. केंद्रातील भाजपा सरकार देश चालवायला लायक नाही हेच त्यावरून स्पष्ट होते. डबल इंजिन सरकार केवळ हवेतच वाफा सोडत असून राज्यातही गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या छाताडावर पुन्हा भगवा फडकावणारच, असा निर्धार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन येथील षण्णमुखानंद सभागृहात जल्लोषात साजरा करण्यात आला. अमित शहांना वारंवार राज्यात येऊन उद्धव ठाकरेंचा जप का करावा लागतो असा सवाल केला. चीनसमोर शेपूट घालता आणि तेच शेपूट ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमच्यावर उगारता. ही मन की बात नाही तर ‘मणिपूरकी बात आहे’, असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.

कायद्याचे राज्य संपुष्टात येऊन तेथील जनता पिसाळली की काय होते याचे प्रत्यंतर मणिपूरमध्ये येत आहे. मणिपूरवरून पंतप्रधानावर टीका केल्यानंतर, सूर्यावर थुंकू नका असा इशारा शिंदे यांनी दिला. मग, तुमचा हा सूर्य मणिपूरमध्ये का उगवत नाही, तुमच्या सूर्याचे करायचे काय, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले. इकडे गर्दी असून तिकडे गारदी आहेत. सगळेच अवली आहेत, पण लव्हली कोणीच नाही. तुम्ही अवली असले तरी जनता कावली आहे. तुम्ही सगळे मानसिक रुग्ण असून उपचारांची गरज असल्याचा हल्लाही चढविला. पक्षातील अनेकांना फोन करून फोडण्यापेक्षा माझ्याकडे यादी द्या त्यांना मी तुमच्याकडे पाठवितो, असेही ठाकरे म्हणाले.

फडणवीसांचा जावईशोध

करोना प्रतिबंधक लस मोदींनी तयार केली, असा जावई शोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. या बाबत फडणवीस यांचे भाषणच ठाकरे यांनी सभागृहात ऐकविले. हास्यजत्रेचा प्रयोग करून राज्यातील जनतेचे फडणवीस यांनी मनोरंजन केल्याची कोपरखळी त्यांनी लगावली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray taunts bjp about hinduism mumbai amy