शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून बंडखोरी होऊ नये तसेच गटबाजीला संधी मिळू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लवकरच सेनेत महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून धनुष्यबाण हाच उमेदवार असेल असे स्पष्ट करत व्यक्तिपूजेला चाप लावण्याचे स्पष्ट संकेत उद्धव यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात दिले.
शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या बैठकीत बुधवारी उद्धव यांनी गटप्रमुख हेच माझे सैन्य असून त्यांच्याच बळावर निवडणुकांची लढाई जिंकायची असल्याचे सांगून नेत्यांची गटबाजी सहन केली जाणार नाही हे दाखवून दिल्याचे मत सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. याच मेळाव्यात सेनानेते रामदास कदम यांची सेनेच्या काही नेत्यांवर नाव न घेता टीकेची तोफ डागली होती. आपण पक्ष सोडणार असल्याच्या अफवा पक्षातूनच पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे मेळाव्यात खळबळ उडाली होती. एकीकडे सेनेतील काही नेत्यांना फुटलेले महत्त्वाकांक्षेचे धुमारे आणि दुसरीकडे मनसेची वाढत चाललेली ताकद लक्षात घेऊन ग्रामीण महाराष्ट्र तसेच मुंबई-ठाण्यात सेनेत बंडखोरी होऊ नये यासाठी शिवसैनिक व गटप्रमुखांची ताकद एकवटण्यावर उद्धव यांनी भर दिला आहे. बाळासाहेबांचे जसे शिवसेनेवर थेट नियंत्रण होते व त्यासाठी शिवसैनिक हीच त्यांनी ताकद बनवली होती तेच धोरण उद्धव ठाकरे हे राबवत असल्याचेच गटप्रमुखांच्या मेळाव्यात दिसून आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाराज व इच्छुकांची संख्या सेनेत मोठी असून ग्रामीण व शहरी भागातील आमादारांमध्येही काही प्रमाणात दरी निर्माण झाली आहे. त्यातच अँजिओप्लास्टी झाल्यामुळे उद्धव ठाकरे पक्षावर राज्यव्यापी नियंत्रण किती ठेवू शकतील अशी शंकाही व्यक्त करण्यात येत होती. या साऱ्याला राज्यभर सभा घेऊन उद्धव यांनी छेद दिला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात प्रचंड सभा घेऊन शिवसैनिकांमध्ये एक विश्वास निर्माण केला तसेच मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा घेऊन मी देईन तोच उमेदवार असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. नेत्यांना वेसण घालण्यासाठीच त्यांनी गटप्रमुखांच्या सैन्याची ताकदही दाखवून दिल्याचे सेनेच्या या नेत्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा