ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या दादर पश्चिममध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधकाम स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेतला. बांधकाम स्थळी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना बांधकामाविषयी सविस्तर माहितीही दिली. मात्र, यावेळी MMRDA चे आयुक्त श्रीनिवास अनुपस्थित असल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंनी स्मारकाच्या ठिकाणी पोहोचताच श्रीनिवास यांच्याविषयी विचारणा केली. मात्र, ते गैरहजर असल्याचं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे काहीसे नाराज झाल्याचंही दिसून आलं.
काय घडलं बांधकाम स्थळी?
उद्धव ठाकरेंनी स्मारकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी आज त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी बांधकाम कशा प्रकारे होत आहे, याची सविस्तर माहिती घेतली. मात्र, त्यांनी या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीतून उतरताच केलेल्या प्रश्नावरून तिथे एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास हजर असणं त्यांना अपेक्षित होतं असं दिसून आलं. तसेच, “ते तिसऱ्यांदा आलेले नाहीत”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनीही आपली नाराजी त्यावेळी बोलून दाखवली.
गाडीतून उतरताच उद्धव ठाकरेंनी श्रीनिवास यांच्याविषयी चौकशी सुरू केली. “एमएमआरडीएचं कोण आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर “देशपांडे आले आहेत”, असं उत्तर गर्दीतून त्यांना कुणीतरी दिलं. त्यावर “पण श्रीनिवास कुठे आहेत?” असा प्रश्न पुन्हा उद्धव ठाकरेंनी विचारला. त्यावर “ते येणार होते पण…” असं तुटक उत्तर समोर आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलं. तेवढ्यात कुणीतरी ते मंत्रालयात असल्याचं म्हटलं. त्यावर “मंत्रालयात काय करतायत. इथे श्रीनिवास यांनी असायला पाहिजे ना”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी काहीशी नाराजी बोलून दाखवली.
आदित्य ठाकरेंनीही दिला दुजोरा!
दरम्यान, यावेळी एकीकडे उद्धव ठाकरे श्रीनिवास यांच्या अनुपस्थितीविषयी विचारणा करत असताना दुसरीकडे आदित्य ठाकरेंनीही त्यांना दुजोरा दिला. “श्रीनिवास इथे आलेले नाहीत. ते तिसऱ्यांदा आलेले नाहीत”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपला रोष व्यक्त केला. यानंतर तिथल्या इतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंना स्मारकाच्या बांधकामाची माहिती दिली.
दरम्यान, स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. “सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हे स्मारक जनतेसाठी खुलं करून देता यावं. झाडांना धक्का न लावता हे काम आपण पूर्ण करत आहोत. महाराष्ट्रात कुणाकडे बाळासाहेबांचे व्हिडीओ फोटो, दस्तऐवज असेल आणि त्यांनी ते आमच्याकडे दिलं, तर ते इथे मांडता येईल”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.