कल्याण- डोंबिवली महापालिकेतील सभागृहात एकमेकांची उणीदुणी काढत पक्षशिस्त पायदळी तुडविणाऱ्या शिवसेनेच्या दोघा ज्येष्ठ नगरसेकांचे राजीनामे मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतले. सभागृह नेते रवींद्र पाटील आणि ज्येष्ठ नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे राजीनामे घेत असताना इतर नगरसेवकांची उद्धव यांनी कानउघाडणी केली. कल्याण, डोंबिवलीकरांची माफी मागा आणि विकासकामांकडे लक्ष द्या, अशा शब्दात त्यांनी या नगरसेवकांना खडे बोल सुनावले.
पाटील आणि शेट्टी यांचे राजीनामे पक्षाने स्वीकारले असले, तरी उद्धव ठाकरे ते आयुक्त राजन भिसे यांच्याकडे सादर करण्याचे धैर्य दाखवतील का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. त्यामुळे जिल्हा संपर्क नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्य़ातील शिवसेना नेत्यांनी घडवून आणलेला राजीनाम्याच्या नौटंकीचा अखेरचा अंक मातोश्रीवर पुर्ण झाल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेनेतील नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि रवींद्र पाटील यांच्यात हाणामारी झाल्याने शिवसेनेतील सुंदोपसुंदीचे दर्शन कल्याण डोंबिवलीकरांना घडले. या घटनेविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच खडबडून जागे झालेल्या शिवसेनेच्या जिल्ह्य़ातील नेत्यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन राजीनाम्याची नौटंकी घडवून आणली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या ३१ तसेच   ९ पुरस्कृत नगरसेवकांनी राजीनामे सादर केले. शिंदे यांनीही आदेशानुसार हे सर्व राजीनामे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविले होते. त्यानुसार मंगळवारी कल्याण डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवकांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले. यावेळी सुमारे ३० मिनीटांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नगरसेवकांची झाडाझडती घेतली. ‘जनतेने विकास कामे करण्यासाठी तुमच्याकडे महापालिकेतील सत्ता दिली आहे. तेथे जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी सभागृहात धिंगाणा करता. सत्ताधारी असून विकासाचे मुद्दे सभागृहात मांडता येत नाहीत आणि विरोधक विकासाचे विषय मांडून चर्चा करीत असतील तर ते सुध्दा तुम्हाला शांतपणे ऐकता येत नाहीत. हे पक्षाला शरम आणणारे आहे. यापूर्वी तुम्ही एका निलंबित अधिकाऱ्याचा प्रस्ताव घाईने मंजूर केल्यामुळे पक्षाची राज्यभर बदनामी झाली आहे. याप्रकरणी खुलासे देताना मला नाकीनऊ आले. आता हाणामाऱ्या करून सत्ता चालवायची असेल तर सर्वांनी राजीनामे द्या आणि स्वबळावर निवडून या’, अशा शब्दात ठाकरे यांनी या नगरसेवकांची खडरपट्टी काढल्याचे विश्वसनिय सुत्रांनी सांगितले. ‘पक्षाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही. मला माफीनामा लिहून देण्यापेक्षा घडल्या प्रकाराबद्दल मतदार जनतेची माफी मागा’, अशी तंबी ठाकरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा