राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत एकत्र येणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या परिवारासह आज (शनिवार) खास विमानाने सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अयोध्येकडे रवाना झाले होते. त्यानंतर दीडच्या सुमारास ते फैजाबाद विमानतळावर पोहोचले.

ढोल-ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचे फैजाबद विमानतळावर शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. विमानतळावर उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंना विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधानांप्रमाणे विशेष प्रोटोकॉल त्यांना देण्यात आला असून याप्रमाणेच त्यांचे स्वागतही करण्यात आले.

नाशिकहून अयोध्येकडे निघालेली जय श्रीराम एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री १० वाजता फैजाबादमध्ये दाखल झाली. तब्बल ३१ तासांचा मोठा प्रवास करुन हे शिवसैनिक अयोध्येत पोहोचले आहेत. यामध्ये वारकऱ्यांचाही समावेश आहे.

उध्दव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे विशेष विमानाने सकाळी ११ वाजता मुंबईहून अयोध्येकडे प्रस्थान करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता ते फैजाबाद विमानतळावर उतरतील. त्यानंतर लक्ष्मण किला येथे साधूसंतांचे ते अशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शरयू आरती करणार आहेत. त्यानंतर २५ नोव्हेंबरला (रविवारी) उद्धव ठाकरे सहपरिवार सकाळी ९ वाजता रामलल्लाचे दर्शन घेतील. दरम्यान, एका सभेद्वारे उपस्थितांना ते संबोधित करणार आहेत. या ठिकाणी ते हिंदीतून भाषण करण्याची शक्यता आहे. यावेळी राम मंदिर उभारण्याची आग्रही मागणी करण्यात येणार आहे. शिवसेना-भाजपामधील तणावाचे वातावरण पाहता या सभेमध्ये मोदी सरकारसह फडणवीस सरकारवरही उद्धव ठाकरे बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अयोध्येतील या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक पोलीस, सीआरपीएफ आणि पीएसीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यामातून येथील प्रत्येक हालचालीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Story img Loader