मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादीची राजवट पुन्हा नको असेल तर भाजप-शिवसेना युती व्हायला हवी ही केवळ भाजपचीच नाही तर या दोन्ही पक्षांच्या मतदारांचीही इच्छा आहे. अयोध्येला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन आल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होतील, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात केंद्र सरकारवर पुन्हा सुरू केलेली टीका, युतीबाबत अद्याप अनुकूल प्रतिसाद न देणे याबाबत पत्रकारांनी मुनगंटीवार यांच्याकडे विचारणा केली असता, भाजप-शिवसेना युती नक्कीच होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे हे काही धोरणांवर, योजनांवर टीका करतात याचा अर्थ ते आमचे विरोधक आहेत असा नव्हे. पक्षातील नेत्यांमध्येही मतभेद असतात. ठाकरे हे तर एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत. मुळात ते करत असलेली टीका ही सरकारच्या योजनांमध्ये, कारभारात सुधारणा व्हावी हा हेतू असतो. त्याकडे विरोध म्हणून पाहणे चुकीचे ठरेल, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.