नरेंद्र मोदींचा द्वेष किंवा आकस करण्याचे आम्हाला काहीच कारण नाही. मात्र, मोदींच्या प्रचारकांनी त्यांची प्रतिमा अजून उंच करायला हवी. त्यांना केवळ गुजरात एके गुजरात एवढ्यापुरता मर्यादित ठेवू नये, एवढीच अपेक्षा शिवसेनेने मंगळवारी ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून व्यक्त केलीये, असा खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
देशाचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गाजावाजा होत असताना मोदी यांनी गुजरात एके गुजरात करावे व आपण फक्त गुजरात राज्यातील जनतेच्या सुख-दुःखाचा विचार करतो, अशी भूमिका घ्यावी, हे मारक आहे, या शब्दांमध्ये ‘सामना’तील अग्रलेखांमध्ये मोदींना लक्ष्य करण्यात आले होते. वृत्तवाहिन्यांवर या अग्रलेखावरून बातम्या प्रसारित होण्यास सुरुवात झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दल खुलासा केला.
ते म्हणाले, सामनातील अग्रलेखाचा राजकीय अर्थ काढू नका. आम्ही मोदींवर नव्हे; त्यांच्या प्रचारकांवर टीका केलीये. राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्त्व करताना मोदींची प्रतिमा अजून उंच करायला हवी. मोदींनी जे काही चांगलं काम केलंय, त्याबद्दल त्यांना राज्यापुरता संकुचित करू नका, एवढीच अपेक्षा आम्ही अग्रलेखातून व्यक्त केलीये. राष्ट्रीय स्तरावर मोदींचे काम चांगले आहे, असे प्रशस्तीपत्रही उद्धव ठाकरे यांनी दिले.