मुंबईतील शिवाजी पार्क (शिवतीर्थ) येथे दसरा मेळावा घेण्याकरता शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. गेल्यावर्षी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यामुळे मुंबईत तणाव वाढला होता. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही असाच तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई पालिकेत केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्याचा ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मातोश्री येथे पारंपरिक वेषभुषेत तीर्थक्षेत्रातील सेवेकरी उद्धव ठाकरेंची भेट घ्यायला आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> दसऱ्याला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा आवाज घुमणार, शिंदे गटाचा अर्ज मागे; ‘या’ दोन मैदानांची चाचपणी

“शिवाजी पार्कचं मैदान आम्हाला हिंदुत्वाच्या विचारांसाठी मिळावं, अशी आमची भूमिका होती. पण, वाद टाळण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रांती मैदानातून हिंदुत्वाचे विचार आपल्याला मांडता येतील, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली. त्यामुळे शिवाजी पार्क येथे आता ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

मातोश्री येथे आज नंदीबैल घेऊन वासुदेवाच्या पोषाखात सेवेकरी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. तसंच, उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षीसुद्धा वाजत गाजत उत्साहाने शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ येथे दसरा मेळावा होणार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्ही देवाची भक्ती करणारी माणसं आहेत. वासुदेव आल्यानंतर दिवसाची सुरुवात सुंदर व्हायची. मुंबईतही पूर्वी वासुदेव यायचे, तेव्हा वाटायची सकाळ झाली. पण आता तुमची परंपरा राहिली काय आणि नाही राहिली काय याचं कोणाला काहीही पडलेलं नाही. पण खुर्ची कशी टिकेल यावर सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक मंत्री आज नाराज आहेत. पण तुमच्यावर होणारा अन्याय पाहून एकतरी मंत्री नाराज झालाय का?”, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. तसंच, तुमचा पाठिंबा असाच कायम ठेवा, अशी विनंतीही त्यांनी सेवेकऱ्यांना केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackerays first reaction after the shinde group withdrew its application for the dussehra gathering for shivaji park sgk
Show comments