भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यांना सर्वाधिक ६६ हजार ५३० मते मिळाली. मात्र दुसऱ्या क्रमांकाची मते नोटा या पर्यायाला मिळाल्याचे दिसून आले तब्बल १२ हजार ८०६ मतदारांनी नोटाचे बटण दाबले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कारण, नोटाचा पर्याय स्वीकारावा म्हणून मतदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला होता. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आशिष शेलार म्हणाले, “अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला मिळालेली मतं ही महाविकासआघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच यांची होती. मी हे बोलतोय याचं कारण असं आहे, २०१४ चे आकडे आपल्याला पाहावे लागतील. गृहितक तेच धरावं लागेल. काँग्रेसच्या मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकरालं असेल, सामान्य मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नाकरालं आहे. नोटाला पडलेली मतं ही महाविकास आघाडीतील बेबनावात एका पक्षाची दुसऱ्या पक्षाला न मिळालेली मतं आहेत.”
हे ठाकरे गटाला सनसनीत उत्तर होतं –
याशिवाय “अंधेरी पोटनिवडणुकीत जे झालं ते बरच झालं. एका आमच्या भगिनीसाठी भाजपा स्वत:ची विजयी होऊ घातलेली जागाही समर्पित करते, ही संस्कृती समस्त महाराष्ट्राने बघितली. आम्हाला उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांनी आवाहन केलं म्हणून आम्ही उमेदवार उभा केला नाही. म्हणून आमच्या मदतीवरच उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकू शकते, अन्यथा शिवसेनेला आमची मतं मिळत नाहीत. याचा अर्थ ते तीन पक्ष एकत्र आले तरी उमेदवाराला मतं पडत नाहीत. हे स्पष्ट झालं आणि म्हणून जनतेने ७० टक्के मतदानापासून पाठ फिरवली हे चौथं चित्र शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सनसनीत उत्तर होतं.” असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांच्या विचाराला केव्हाच तिलांजली दिली –
याचबरोबर “स्वबळावर उभा राहता येत नाही, जिंकता येत नाही, प्रचार करता येत नाही. स्वपक्षाचं बळ निघून गेलेलं आहे, ४० आमदार, दहा अपक्ष, मंत्री गेलेत. रोज नवीन अध्याय हा उद्धव ठाकरेंची शिवसेना दाखवत आहे. पहिल्यांदा मतांसाठी खोटं बोलणं, हे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केलच. मग दुसऱ्यांदा सत्तेसाठी विश्वासघात केला. आता मतं आणि सत्ता महापालिकेत मिळवण्यासाठी लांगूलचालन आणि तुष्टीकरण हा मार्ग स्वीकारला आहे. बाळासाहेबांच्या विचाराला केव्हाच तिलांजली दिली. मी, माझं कुटुंब माझी सत्ता, माझ्या कुटुंबाला आणि मुलाला मिळणारी सत्ता यासाठी वाटेल ते करण्याची ही नवीन स्पर्धा ठाकरे गटाकडून सुरु आहे.” असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.