अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसणार आहे. तर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून ही लढाई भाजपा विरुद्ध ठाकरे गट असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज(शुक्रवार) दादर येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाला या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा मिळेल का? असं प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की, “राज्याच्या इतिहासात असं अनेकदा झालंय की, त्या कुटुंबाला नेहमी सहानुभूती मिळत असते. पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी मशाल घेतली आहे. आपण जर मागील अडीच वर्षांचा इतिहास पाहिला तर मशालीच्या मागे काय आहे, तर उद्धव ठाकरेंची कृती ही काँग्रेससोबत आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत त्यांची कृती आहे आणि युती आहे. त्यामुळे त्यांची मशाल ही काँग्रेसच्या हाती आहे आणि दुसरीकडे मशाल पकडलेला त्यांचा जो हात आहे, त्यावर घड्याळ बांधलेलं आहे, जे शरद पवारांचं आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांने पंजा आणि घडाळ्यासोबत मशाल पाहिली तर तो कधीही मतदान करणार नाही. आता त्या मशालीत शरद पवार तेल टाकत आहेत, त्यांनी ती मशाल कितीही पेटवण्याचा प्रयत्न केला तरी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना जी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे, आम्ही दोघेही ही मशाल विझवल्याशिवाय राहणार नाही. पंजा आणि घडाळ्यासोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंचा विचार आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही.”
तर “मुरजी पटेल यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. मला विश्वास आहे की ५१ टक्के मतं घेऊन, मुरजी पटेल हे १०० टक्के विजयी होतील. ही निवडणूक १०० टक्के महत्त्वाचीच असणार आहे. कोणतीही निवडणूक ही महत्त्वाचीच असते. पण अंधेरीची निवडणूक ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे.” असही यावेळी बावनकुळे म्हणाले.
पाहा व्हिडिओ –
याशिवाय ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून घडलेल्या घडामोडींबाबत बोलताना बावनकुळेंनी “मला वाटतं राजीनामा स्वीकारणे अथवा न स्वीकारणे हा महानगर पालिकेचा अधिकार आहे. न्यायालयाने आपला न्यायालयीन अधिकार वापरला. भाजपा म्हणून आमचा कुठेही यामध्ये संबंध नाही. जे उमेदवार देतील त्याच्याविरोधात आम्हाला लढायचं आहे. त्यामळे कोणीही उमेदवार आला तरी आमची लढाई पक्की आहे. ५१ टक्के मतं घेऊन आम्ही जिंकणार आहोत.” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.