हिंदुत्वाचा विचार शिवसेना देते व यापुढेही देत राहणार. हिंदू म्हणून आम्ही अभिमानाने वाटचाल करणार. या देशातील कोटय़वधी हिंदूंनी एकगठ्ठा मतदान केले तर बांग देणारी काँग्रेस-राष्ट्रवादी शिल्लक राहणार नाही. रामाने जसा रावणाचा वध केला, तसाच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेले भ्रष्टाचाराचे रावण आपल्याला गाडून टाकायचे आहेत, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चौफेर हल्ला चढविला. त्याच वेळी पक्षात बेबंदशाहीला कोणताही थारा मिळणार नाही, असा इशारा उद्धव यांनी दिला.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या मागे शिवसेना ताकदीने उभी राहील. देशाचे नेतृत्व करण्यासाठी मोदी समर्थ आहेत, असे सांगतानाच केंद्रातील यूपीएचे सरकार खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ अशी टीका शरद पवार यांनी मोदी यांच्यावर केली होती. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, पवारांसारखा थकलेला नवरा हा सगळीकडेच बाशिंग बांधून बसला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून प्रत्येक ठिकाणी जागा अडवणाऱ्या पवारांनी आजपर्यंत काय काम ‘करून दाखविले’? मोदी यांच्यावर टीका करणारे पवार आपल्या ‘दिवटय़ा’ पुतण्याविषयी का बोलत नाहीत? ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा हिशेब त्यांनी मागितला. सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. यात अजित पवार गुन्हेगार असतील, तर ते तुरुंगात गेले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बिनकामाचे आहेत. उद्या जर ठाण्यात एखादी इमारत पडली तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असे ते म्हणाले.
राहुल गांधी, शरद पवार विदर्भात फिरले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. सरकारचे अस्तित्व शून्य आहे. न्यायालये, एनजीओ, प्रसारमाध्यम यापैकी नेमके कोण सरकार चालवते आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दिल्लीत उद्योगपतींना भेटलो, तेव्हा ते म्हणाले की सरकार प्रीपेड कार्डासारखे चालत आहे. पैसे भरले आणि फोन लावला तरी नेटवर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जाते. केवळ उद्योगपतींना ओरबाडण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे देशासाठी काम करीत नाहीत, तर केवळ सोनिया-राहुलसाठी काम करतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
नरेंद्र दाभोलकर यांचे खुनी सापडत नाहीत, म्हणून हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. शरद पवार यांनी इशरत जहाँला निष्पाप असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यांच्याकडे हेडलीपेक्षा जास्त माहिती आहे का, असा सवाल करताना प्रज्ञा सिंग आणि जनरल पुरोहित यांना हिंदू म्हणून तुरुंगात ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. धर्माध शक्तींचा पराभव करण्यासाठी मुसलमानांनी एकगठ्ठा मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री करतात म्हणून मी तुम्हाला सांगतो हिंदूंचे लोंढे आता मतदानाला उतरवा. या सरकारचे विसर्जन करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. या वक्तव्याबाबत माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर सर्व प्रथम मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा. आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही. जो या देशाला मानतो, तो प्रत्येक मुसलमान आमचा आहे. मात्र आता हिंदूंच्या वाटेला जाऊ नका. जादूटोणा विधायक सर्वधर्मीयांसाठी राबविणार नसतील, तर त्याबाबतचा वटहुकूम फाडून टाका. सर्व हिंदू जर एकत्र आले नाहीत, तर अराजक देशाचा उंबरठा कधी ओलांडेल हे कळणारही नाही, असा इशारा त्यांनी दिला.
उद्धव यांचा हिंदुत्वाचा पुकार
हिंदुत्वाचा विचार शिवसेना देते व यापुढेही देत राहणार. हिंदू म्हणून आम्ही अभिमानाने वाटचाल करणार. या देशातील कोटय़वधी हिंदूंनी एकगठ्ठा मतदान
First published on: 14-10-2013 at 01:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thakre defended hindutva in shiv sena dasara rally