विधानसभा व लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत झालेली मतविभागणी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात लगेचच येऊ घातलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान यांमुळे उद्धव ठाकरे यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आगामी निवडणुकीत जुळवून घेण्याचे संकेत स्वत उद्धव ठाकरे यांनीच दिल्याने, सेना-मनसे ऐक्याची स्वप्ने पाहणाऱ्यांच्या अपेक्षांचे धुमारे पुन्हा तरारले आहेत.
शिवसेनेच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच ‘सामना’ या पक्षाच्या मुखपत्रातून पक्षाचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत, आगामी निवडणुका एकत्र लढण्याच्या मुद्दय़ावर राजसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आम्हा दोघांनी एकत्र बसून यावर निर्णय घेण्याची गरज असून शिवसेनेबरोबर युती करण्याची राजची इच्छा असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युतीस अनुकूलताही दर्शविली. शिवसेनेसोबत येण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत होईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले. टाळी एका हाताने वाजत नाही, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्या प्रतिसादाची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
शिवसेनेतील नेतृत्वाच्या वादातूनच राज ठाकरे यांनी २००६ मध्ये पक्षाबाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून मनसे आणि शिवसेना यांच्यात सातत्याने तीव्र सामना सुरू असताना आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मनसेसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे.
या देकारानंतर सेना-मनसे एकत्र आल्यास आगामी निवडणुकीची समीकरणे बदलण्याच्या शक्यतेने राज्याच्या राजकारणात लगेचच उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

ही पक्षाची आगामी दिशा- खा. राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मुखपत्रातून मांडली आहे. ही त्यांची केवळ मुलाखत नव्हे, तर पक्षाची आगामी दिशा आहे, असे खा. संजय राऊत यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या हयातीत एकत्र बसविण्याचा प्रयत्न का झाला नाही, या प्रश्नावरही उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले. मात्र दोघांची इच्छा असल्यास एकत्र मुलाखत होऊ शकते एवढेच त्यांनी सांगितले.

राज यांचे मौन
उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे राज ठाकरे यांनी बुधवारी टाळले. एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले असताना राज ठाकरे काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र ‘आजचा दिवस दादांचा (मधुकर सरपोतदार) आहे, दादूंचा नाही. त्यामुळे आज माझ्याकडून तुम्हाला काहीही खाऊ मिळणार नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन,’ असे राज म्हणाले.

Story img Loader