मुंबई : परदेशातील उच्च शैक्षणिक संस्थांमधून पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला समकक्ष पदवीची मान्यता दिली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबतचा निर्णय शनिवारी अधिसूचनेद्वारे जारी केला. याचा फायदा परदेशात शिकून मायदेशी परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना होणार आहे. भारतात उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना किंवा नोकरी करताना ही मान्यता आवश्यक आहे.
परदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन भारतामध्ये परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. मात्र त्यांच्या पदवीला समकक्ष मान्यता मिळाल्याशिवाय त्यांना भारतात उच्च शिक्षण घेता येत नाही किंवा नोकरी करता येत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होते. अशा विद्यार्थ्यांना समकक्ष पदवी मान्यता देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय ‘यूजीसी’ने घेतला आहे. नुकतेच अमेरिकेतून भारतात माघारी पाठविण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना समकक्ष पदवी मान्यता मिळावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी केलेला अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पदवी मान्यता देताना विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेतलेल्याचा किमान कालावधी आणि क्रेडिट, मुख्य विषय, ऐच्छिक, प्रयोगशाळा अभ्यासक्रम, तास, स्वयं-अभ्यासाचे तास आणि अनुभवात्मक शिक्षण घटक या घटकांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.