Maharashtra Satta Sangharsh : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. तसेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यांचं सरकार पूनर्स्थापित करू शकत नाही, असंही ते म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात आता कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची कायदेशीर बाब सांगितली आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय म्हणाले उज्ज्वल निकम?
“उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी भावनाविवश होऊन किंवा अन्य काही कारणांमुळे व्यथित होऊन राजीनामा दिला असेल. मात्र, राजीनामा देताना, ‘राज्यपालांच्या अयोग्य कृतीमुळे मी राजीनामा देतो आहे’, असा उल्लेख त्यांनी राजीनामापत्रात केला असता, तर आज कदाचित सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सरकारची पुर्नस्थापन केली असती”, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षाकडे सोपवण्याच्या निर्णयावरही भाष्य केलं. “१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधी घ्यावा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट उल्लेख केला नसला तरी हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, हे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विशिष्ट मुदतीत त्यांनी हा निर्णय घेणं अपेक्षित आहे”, असं ते म्हणाले.
हेही वाचा – “…तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, न्यायालयाने शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती अवैध असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “व्हिप ठरवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे. मात्र, आता शिवसेना ही शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याबाबत नेमकं काय म्हटलं आहे. हे पूर्ण निकाल वाचल्यानंतरच सांगता येईल”, असं ते म्हणाले.