सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या अंगरक्षक रवींद्र पाटील यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य का धरली नाही? असा सवाल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयाने गुरूवारी हिट अँड रन प्रकरणी सलमानला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाच्या या निर्णयावर उज्ज्वल निकम यांनी नाराजी व्यक्त केली. रवींद्र पाटील हयात असताना त्यांनी सत्र न्यायालयात साक्ष दिली होती. त्यात पाटील यांनी सलमानने मद्यप्राशन करुन गाडी चालवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली होती. पण हे प्रकरण जेव्हा उच्च न्यायालयाचे वर्ग झाले तेव्हा रवींद्र पाटील यांचा मृत्यू झाला होता. अशावेळी सत्र न्यायालयात नोंदविण्यात आलेली रवींद्र पाटील यांची साक्ष जशीच्या तशी ग्राह्य धरण्यात उच्च न्यायालयाला काहीच हरकत नव्हती. पण न्यायालयाने तसे का केले नाही? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले.
रवींद्र पाटील हे १३ वर्षांपूर्वी सलमानसोबत त्याच अपघातग्रस्त कारमध्ये होते. रवींद्र पाटील हे सलमानचे अंगरक्षक म्हणून त्या कारमध्ये होते. सलमानच्या कारने पदपथावर झोपलेल्यांना चिरडलं, त्यावेळी रवींद्र यांनीच वांद्रे पोलिसांत याबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे रवींद्र हे या खटल्यातील मुख्य साक्षीदार होते. पण, रवींद पाटील यांची साक्ष लावण्यात आलेल्या आरोपांसंदर्भातील कायद्यातील तरतुदींनुसार ग्राह्य धरता येणार नाही, असे मत उच्च न्यायालायने आपल्या निकालात म्हटले आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल अंतिम नसून सरकारी पक्षाकडे सर्वोच्च न्यायालयाचाही पर्याय आहे. त्यामुळे सरकारी पक्ष कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे, असेही निकम पुढे म्हणाले.