पाच कोटी खर्चून उल्हास नदीवर पुलाची उभारणी; मुंबई-अहमदनगर महामार्गाला जोडणारा मार्गच तयार नाही
कधी कागदोपत्री काम दाखवून बिले काढल्यामुळे तर कधी चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यामुळे अशा या ना त्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. कल्याण तालुक्यातील शहाड-आंबिवली-मोहने परिसरातील नागरिकांना थेट मुंबई-अहमदनगर महामार्गावर जाता यावे यासाठी मोहने-वरपदरम्यान उल्हास नदीवर पाच कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात आला. हा पूल तयार झाला असला तरी पूल आणि महामार्ग या दरम्यानच्या जोडरस्त्याची तजवीजच करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विसरल्याची बाब समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या या बेफिकिरीमुळे आता रस्त्यासाठी भूसंपादन करण्यापासून रस्ता पूर्ण होईपर्यंत हा पूल वापराविना राहणार असून लोकांनाही गैससोयीला सामोरे जावे लागणार आहे.
मोहने, मोहिली, वरप, गाळेगाव, गोळवली, एनआरसी कॉलनी या भागातील लोकांना मुंबई-अहमदनगर महामार्गावरून म्हणजेच कल्याण-मुरबाड रस्त्याने माळशेजकडे जाण्यासाठी शहाडमार्गे जाताना सुमारे १० किमी लांबीचा वळसा घालावा लागतो. लोकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी मोहने-वरप दरम्यान उल्हास नदीवर पूल बांधण्याचा निर्णय सरकारने सन २०१४मध्ये घेतला. १४० मीटर लांब आणि ७.५० मीटर रुंदीचा हा पूल १८ महिन्यांत बांधण्याचा ठेका नोव्हेंबर २०१५मध्ये श्री दत्त कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आला. सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या या पुलाची उभारणी झाली आहे. मात्र पुलापासून महामार्गापर्यंतचा जोडरस्ता कागदावरच असल्याने पुलाचा वापर करण्यासाठी आणखी किमान दोन वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. या पुलापासून काही अंतरावरून कल्याण-मुरबाड रस्ता जात असून पुलास या रस्त्याला जोडणाऱ्या अकराशे ते बाराशे मीटर लांबीच्या रस्त्याचा अद्याप पत्ता नाही. हा रस्ता खासगी जमिनीतून जात असल्याने प्रथम भूसंपादन करावे लागणार आहे. पुलाचा प्रस्ताव तयार करताना जोडरस्त्याचा प्रस्ताव का तयार करण्यात आला नाही, असा सवाल या भागातील नागरिकांनी केला. पुलाच्या कामाबरोबरच जोड रस्त्याचे काम सुरू झाले असते तर यंदाच्या पावसात लोकांना चांगली सुविधा मिळाली असती. पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेफिकीर कारभारामुळे पूल तयार असूनही त्याचा लाभ घेण्यासाठी लोकांना आणखी दोन वर्षे वाट पाहवी लागणार असल्याचा आरोपही गाळेगावच्या ग्रामस्थांनी केला. जोड रस्त्याच्या मंजुरीचा प्रस्ताव आता सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत ठाणे विभागाचे अधिक्षक अभियंता एन.एम. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, पुलापासूनचा महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव तयार झाला असून पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होताच हे काम सुरू केले जाईल असे सांगितले. पहिल्या टप्यात पुल आणि दुसऱ्या टप्यात जोड रस्ता करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुलाचे काम सुरू होत असतानाच रस्त्याचेही काम सुरू झाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता, पण रस्त्याचा प्रस्तावच तयार न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करू. – चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री