महावितरणच्या आंधळ्या कारभाराचा फटका एका सामान्य रहिवाशाला बसला आहे. दीडशे स्व्केअर फुटांच्या घरात राहणाऱ्या या रहिवाशाला महावितरणने दीड लाखांचे वीज बिल पाठवले आहे. 10 बाय 15 फुटांचं चाळीतलं घर त्यामध्ये एक पंखा, टीव्ही, फ्रिज असं मोजकंच सामान आहे. पण विजेचं बिल आलं 1 लाख 59 हजार. उल्हासनगरजवळच्या वरप गावात भागवत काकडे यांना हे बिल आलं आहे. भागवत हे ड्रायव्हर म्हणून काम करतात. कमी पगार, त्यात घर चालवण्यासाठी तारेवरची कसरत आणि अचानक आलेल्या या बिलाने त्यांना धक्काच बसला आहे. या बिलाबाबत त्यांनी महावितरणकडे तीन महिन्यात अनेक फेऱ्या मारल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
भागवत काकडे यांच्याप्रमाणेच या परिसरात राहणाऱ्या अनेकांना वाढीव वीज बिलं आली आहेत. कुणाचे बिल 15 हजारांच्या घरात आहे तर कुणाचे बिल 20 हजारांच्या घरात. या भागात राहणारे बहुतांश लोक रिक्षा, टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतात. दिवसभर राबायचं पोटाची खळगी कशीबशी भरायची त्यात वीज बिलाचे हे मोठे आकडे पाहिले त्यांचे प्राण कंठाशीच येतात.
महावितरणने याकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. तक्रारी करून काहीही फरक पडलेला नाही. आता या बिलांचं काय करायचं या विवंचनेत भागवत काकडेंसह इतर रहिवासीही आहेत.