उमा कुलकर्णी ज्येष्ठ अनुवादिका
माझ्या मराठी वाचनाचा फायदा अनुवादासाठी साहित्याची निवड करताना झाला. मला जे आवडते ते वाचकांना नक्कीच आवडेल एवढीच माझी साहित्य निवडीमागची भूमिका असते. अनुवादासाठी वाणी आणि भाषा स्वच्छ लागते. त्याचे पोषण आणि अनुवाद करण्यासाठी आकलनशक्ती ही केवळ साहित्य वाचनातूनच येते.
मी मूळची बेळगावची. पूर्वाश्रमीची सुषमा कुलकर्णी. माझी मातृभाषा मराठी. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मराठी माध्यमातून झाले. मात्र, मराठीबरोबरच कन्नड भाषा कानावर पडत गेली. घरात आम्ही सात भावंडे. वडिलांना वाचनाची आवड असली तरी मोठय़ा कुटुंबाची जबाबदारी असल्याने पुस्तके घेण्याची ऐपत नव्हती. मात्र वाचनाची गोडी लागावी यासाठी वाचनालयातून आम्ही पुस्तके आणून वाचत असू. मात्र दिवाळीच्या खरेदीमध्ये आकाशकंदिलाबरोबरच वडील चार-पाच दिवाळी अंक आवर्जून आणत असत. रजपूत बंधू शाळेत असताना पाचवीपासून चित्रकला आणि संगीत हे विषय होते. ज्येष्ठ गायक पं. संगमेश्वर गुरव यांचे वडील मला संगीत शिकवायचे. शाळेमध्ये पुस्तकांचा पेटारा असायचा. एखाद्या तासाला शिक्षक नसले की मग मुलांना त्या पेटाऱ्यातून पुस्तके वाचायला दिली जायची. कमल लायब्ररीचे ग्रंथपाल वय पाहून पुस्तके वाचनासाठी देत असत. त्यामुळे कुणाच्या हाती काय पुस्तक पडावे याचे तारतम्य त्यांच्याकडे होते.
पु. ल. देशपांडे मराठी शिकवीत असत त्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले. ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर सर मला मराठी शिकवीत. त्यांनी मला जयवंत दळवी यांची ‘चक्र’, ना. सं. इनामदार यांची ‘मंत्रावेगळा’, मधू मंगेश कर्णिक यांची ‘माहीमची खाडी’ या कादंबऱ्या वाचनासाठी दिल्या होत्या. मी ‘सावित्री’ कादंबरी वाचली होती. अर्थात त्या वेळी मला ती कळलीच नाही. पुढे काही वर्षांनी पुन्हा ती कादंबरी वाचली तेव्हा समजली. पती विरुपाक्ष कुलकर्णी यांचे वाचन कन्नडमध्ये आणि तेही महाविद्यालयीन शिक्षण सुरू होईपर्यंतच झाले. मात्र विवाहानंतर माझे वाचन सुरूच राहिले. मी काय वाचले ते त्यांना आणि त्यांनी कन्नडमध्ये काय वाचले ते मला सांगायचे. त्यामुळे कन्नड भाषक साहित्यिकांची नावे माझ्या परिचयाची झाली. माझे वाचन अद्ययावत राहिल्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांना अनुवादासाठी साहित्यकृतीची निवड करण्यामध्ये मदत करायचो. आमच्या घरामध्ये माझ्या मराठी पुस्तकाचे आणि त्यांच्या कन्नड पुस्तकांचे अशी दोन स्वतंत्र बुकशेल्फ आहेत.
ज्ञानपीठ पुरस्कारविजेते शिवराम कारंथ यांची कादंबरी समजून घेण्यासाठी म्हणून मी अनुवादाकडे वळाले. ‘मुकज्जीची स्वप्ने’ ही त्यांची कादंबरी हा माझा पहिला मराठी अनुवाद. विरुपाक्ष एकेक वाक्य वाचून दाखवायचे आणि ते मी मराठीमध्ये लिहून घ्यायचे. मात्र या कादंबरीचा मीना वांगीकर यांनी केलेला ‘मुकज्जी’ हा अनुवाद प्रकाशित झाला. त्यानंतर मी कारंथ यांचीच ‘तनमनाच्या भोवऱ्यात’ ही कादंबरी अनुवादित केली. ती २ ऑक्टोबर १९८२ रोजी प्रकाशित झाली होती. पुढे ३५ वर्षांनी पुन्हा मी याच कादंबरीचा नव्याने अनुवाद केला. पूर्वी अनुवाद करताना शिवराम कारंथ या नावाचा माझ्यावर पगडा होता. त्यामुळे तो अनुवाद बंदिस्त होता. लेखकाचे दडपण घेण्याचे कारण नाही हे मला नंतर अनुभवातून उमजत गेले.
वैचारिक लेखनामध्ये भाषांतर जसेच्या तसे करावे लागते. कथा-कादंबरी अशा ललित कलाकृतीमध्ये भाषा वेगळी वापरून आशय तोच ठेवता येतो. कवितेचा अनुवाद करताना वेगळ्या पद्धतीने भान ठेवावे लागते. लेखकाला काय म्हणायचे आहे म्हणजेच ‘बिटवीन द लाइन’ हे समजणे महत्त्वाचे असते. मातृभाषेत अनुवाद केल्यामुळे भाषा लवचीकपणे वापरू शकतो. मी कन्नड साहित्याचा मराठी अनुवाद करते. तर, विरुपाक्ष मराठी साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करतात. डॉ. एस. एल. भैरप्पा, डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड या ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या लेखकांसह वैदेही, सुधा मूर्ती, फकीर महंमद कटपाडी, माधव कुलकर्णी अशा ३०-३५ लेखकांच्या साहित्यकृतींचा मराठी अनुवाद केला आहे.
सध्या सेतुराम यांच्या कथांचा अनुवाद करण्याचे काम सुरू आहे.
प्रत्येकाचा अनुवादाचाही पिंड असतो. प्रत्येक कलाकृतीचा तो तितक्याच ताकदीने अनुवाद करू शकतो असे होत नाही. कथा-कादंबरी माझ्या आवडीचा साहित्यप्रकार असल्याने त्या अनुवादामध्ये मी रमते. कवितेचा अनुवाद करताना दडपण येते. नाटकाचा अनुवाद हा वेगळाच असतो. वेगवेगळी पात्रं ती वाक्ये बोलणार आहेत याचे भान अनुवाद करताना ठेवावे लागते.
आता समीक्षा साहित्याप्रमाणेच अनुवादालाही मान्यता मिळत आहे. तिसऱ्या दर्जाचे लेखन करण्यापेक्षा अनुवाद करणे मला पसंत आहे. तुमचे काम निष्ठेने केल्यानंतर श्रेय मिळते याची प्रचीती मला आली आहे. उत्तम लेखक कितीही प्रतिभावान असला तरी एका क्षणी त्याला थांबावेसे वाटते. पण अनुवादकाला ही भीती नसते. तो उत्तम कलाकृती वाचकांना देऊ शकतो. अजूनही माझ्याकडे काम असते. हे करीत असताना माझे वाचन सुरू असते. जी पुस्तके मी परत वाचणार नाही अशी पुस्तके ग्रंथालयांना भेट देते. त्यामुळे नव्या पुस्तकांना जागा उपलब्ध होते.