सट्टेबाज पवन आणि संजय जयपूर हे सातत्याने आंतरराष्ट्रीय पंच असद रौफ यांच्या संपर्कात होते. पवन याने रौफ यांना सिमकार्डही दिले होते. याच सिमकार्डवरून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलीये. असद रौफ यांना चौकशीसाठी भारतात आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याबद्दलही मुंबई पोलिस विचार करत आहेत.
आयपीएलमधील सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱयांचे मोठे रॅकेट मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. याच आरोपावरून बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंग आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांना पोलिसांनी अटक केलीये. या दोघांकडून तसेच मुबंई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सट्टेबाजांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल सामन्यांमध्ये रौफही सट्टेबाजांना विविध स्वरुपाची मदत करत असल्याचे उघड झाले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने असद रौफ यांचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळले आहे. सट्टेबाजीसंबंधी वेगवेगळ्या आरोपींना अटक करण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केल्यानंतर असद रौफ लगेचच भारतसोडून पाकिस्तानात पळून गेले.
स्पॉट फिक्सिंगवरून दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू आणि सट्टेबाजांना अटक केल्यानंतर विंदू दारा सिंगने रौफ यांना मोबाईलवर फोन केला. दिल्ली पोलिसांनी केलेल्या अटकसत्रांबद्दल कळले का, असे त्याने रौफ यांना विचारले. रौफ यांनी त्याला होकारार्थी उत्तर दिल्यावर विंदूने त्यांना त्यांच्याकडील सिमकार्ड नष्ट करण्यास सांगितले. हा विषय खूप तापण्याची शक्यता त्याने रौफ यांच्याकडे वर्तविली. त्यानंतरच ते लगेच २१ मे रोजी पाकिस्तानला पळून गेले, असे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका अधिकाऱयाने सांगितले.

Story img Loader