भाजपचे माजी खासदार आणि चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या जेव्हीपीडी स्कीम परिसरातील ‘रामायण’ बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने सोमवारी हातोडा चालविला. पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने दोन वेळा नोटीस बजावल्यानंतरही ‘रामायण’मधील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले नाही. त्यामुळे पालिकेने सोमवारी हे अनधिकृत बांधकाम तोडले.
जेव्हीपीडी स्कीम परिसरातील एन. एस. रस्ता क्रमांक ५ येथे शत्रुघ्न सिन्हा यांचा ‘रामायण’ बंगला आहे. या बंगल्यातील अग्निसुरक्षेसाठी मोकळ्या ठेवलेल्या जागेत (रेफ्यूजी मजला) अनधिकृतपणे दोन शौचालये, एक पॅन्ट्री, गच्चीवर एक शौचालय, मोकळ्या जागेत देवघर आणि कार्यालय उभारण्यात आले होते. त्याचबरोबर गच्चीमध्ये जाण्यासाठी पालिकेची परवानगी न घेता जिना उभारण्यात आला होता. बंगल्याच्या सर्वच मजल्यांवरील ‘डक्ट’च्या भागावर अतिक्रमण करण्यात आल्याचे आढळले होते. त्यामुळे पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने ‘रामायण’वर ५ डिसेंबर २०१७ रोजी ‘एमआरटीपी’ कायद्यातील कलम ५३ (१) अन्वये नोटीस बजावली होती. मात्र ‘रामायण’मधील अनधिकृत बांधकाम हटविण्यात न आल्यामुळे पालिकेने ६ जानेवारी २०१८ रोजी अंतिम नोटीस बजावली.
दोन वेळा नोटीस बजावल्यानंतरही अनधिकृत बांधकाम तोडण्यात न आल्यामुळे अखेर पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाने ‘रामायण’वर बुधवारी कारवाईचा बडगा उगारला. बुधवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकारी, कर्मचारी ‘रामायण’मध्ये दाखल झाले आणि त्यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यास सुरुवात केली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.