रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल ३७९ मंडळांना यंदा विविध कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. गणेशोत्सव सुरू होऊन सोमवारी मंडपात गणेशमूर्ती मंडपात विराजमान होत असताना मोठय़ा संख्येने यंदाही मंडपांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तर अद्याप ८७ मंडपांचे अर्ज प्रक्रियेत आहेत. एकूण ३०६४ अर्जापैकी २ हजार ५९८ मंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाही अनधिकृतपणे रस्त्यावर मंडप उभारून अनेक मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा होणार आहे.
वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या मंडपांनाच परवानगी देण्यात यावी असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहतुकीला अडथळा येत नसल्याचे प्रमाणपत्र पोलिसांनी व ट्रॅफिक पोलिसांनी दिल्यावरच पालिकेकडून परवानगी दिली जाते. यंदा अशा ३७९ मंडपांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मंडळांना परवानगी देण्यासाठी पालिकेने गेल्या वर्षीपासून ऑनलाइन पद्धत आणली. मात्र अनेक मंडळे न्यायालयाचे निर्देश पाळत नसल्यामुळे त्यांना परवानगी मिळत नाही. पालिका व पोलिसांच्या परवानगीशिवाय दरवर्षी अनेक मंडपे उभे राहिले असताना या वेळीही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नवीन रस्ते किंवा नवीन वसाहती उभ्या राहिल्या आहेत अशा ठिकाणी नवीन गणेशोत्सव मंडळे उभी राहिली की त्यांचे नव्याने अर्ज पालिकेकडे येत असतात. तसेच आतापर्यंत परवानगी न घेणारी मंडळेही पालिकेकडे येऊ लागल्यामुळे दरवर्षी रस्त्यावरील मंडळांची संख्या वाढत असते.
३१ ऑगस्टपर्यंतची स्थिती
- पालिकेकडे आलेले एकूण अर्ज – ३७२७ दोनदा आलेले अर्ज – ६६३
- छाननीसाठी आलेले अर्ज – ३०६४
- परवानग्या दिल्या – २५९८
- परवानग्या नाकारल्या – ३७९
- अर्ज प्रक्रियेत – ८७
२०१७ पासूनची स्थिती
- २०१७ मध्ये विचारात घेतलेले अर्ज- २२००
- २०१८ मध्ये विचारात घेण्यात आलेले अर्ज – २४८८
- २०१९ मध्ये विचारात घेण्यात आलेले अर्ज – ३०६४
गणपती सजावटीच्या साहित्य विक्रीत घट
रविवारी पावसाने लावलेली हजेरी, राज्यातील अनेक भागांमध्ये पूरामुळे झालेले नुकसान या पाश्र्वभूमीवर शहरातील बाजारात गणपती सजावटीसाठीच्या साहित्य खरेदीत नागरिकांचा उत्साह कमी राहिला. या साहित्याच्या विक्रीत घट झाल्याचे चित्र होते.
गणपती आगमन आधीचा शेवटाचा रविवारअसल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होईल या आशेवर दुकानदारांनी मोठय़ा प्रमाणात या वस्तू बाजारात आणल्या होत्या. मात्र, रविवारी सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. त्यामुळे दुपारपर्यंत अपेक्षित विक्री झाली नसल्याचे दुकानदार सांगत होते. हाच निरूत्साह संध्याकाळीही राहिल्याने यावर्षी विक्री सुमारे ३० टक्कांपर्यंतची घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचबरोबर गावाकडे बसवल्या जाणाऱ्या गणपतीसाठी साहित्य खरेदी करायला येणारे ग्राहकही फिरकले नसल्याचे सांगण्यात आले.
‘कोल्हापूर आणि सांगली परिसरात पूराने नुकसान झाले आहे. दरवर्षी या भागातील नागरिक गावाला घेऊन जाण्यासाठी साहित्य खरेदी करायला दादरच्या बाजारात येतात. मात्र हे मुंबई बाहेरील ग्राहक बाजारात फिरकलेच नाहीत. त्यामुळे मागील वर्षी एवढाही व्यवसाय होत नसून विक्रीत २५ ते ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे वस्तूंच्या मागे मिळणाऱ्या नफ्यात ५० टक्के इतकी घट करून विक्री करत आहोत,‘ अशी व्यथा दादर परिसरातील विक्रेते राहूल पाटोळे व्यक्त यांनी व्यक्त केली.