अंधेरी परिसरातील हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून आतापर्यंत ११ हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यात आला आहे. नऊ हॉटेल्समधील सुमारे १५ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.
कमला मिलमधील ‘मोजो बिस्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या रेस्टो पबला लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेने मुंबईमधील हॉटेल्सची तपासणी करुन अधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला होता. अंधेरी पश्चिम परिसरातील ११ हॉटेल्समध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले असून या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हातोडा चालविला आहे. नऊ हॉटेल्समधील तब्बल १५ हजार चौरस फुटांहून अधिक अनधिकृत बांधकाम पालिकेने कारवाई दरम्यान तोडून टाकले. यामध्ये ‘इंडिपेंडंट ब्रेवरीज’, ‘स्पेस बार’, ‘लिटल डोअर’, ‘कॅलिडो’, ‘ब्र्यूबॉट’, ‘ऑटम’, ‘ग्लोकल जंक्शन’, ‘बी देसी’, ‘बियॉण्ड बार’ या हॉटेल्सचा समावेश आहे. तसेच ‘राईक टेरेस बार’, आणि ‘बार्बेक्यू नेशन’ या हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली.
‘परिमंडळ -४’चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात ही कारवाई करण्यात आली. प्रामुख्याने उपहारगृहांमध्ये मोकळी जागा सोडणे आवश्यक आहे. मात्र या मोकळ्या जागेत अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. ही बांधकामे कारवाई दरम्यान तोडण्यात आली, अशी माहिती ‘के पष्टिद्धr(१५५)म’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वसरेवा व वसरेवा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो.
या परिसरातील विविध हॉटेल्समधील मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाद्वारे करण्यात येत असलेल्या या कारवाईकरिता २५ पोलिसांचा ताफा संबंधित घटनास्थळी तैनात असून या कारवाईत महापालिकेचे २० कर्मचारी अधिकारी सहभागी झाले आहेत.