मुंबई : महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाच्या हद्दीतील गोवंडी शिवाजीनगर आणि मानखुर्द परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत मोबाइल टॉवर उभे आहेत. या टॉवरविरोधात अनेकदा तक्रारी करूनही महापालिका त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना एम-पूर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मानखुर्द, गोवंडी आणि शिवाजी नगर परिसरात अनधिकृतरित्या शेकडो मोबाइल टॉवर उभारण्यात आले आहेत. या अनधिकृत मोबाइल टॉवरमुळे आसपासच्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. एकीकडे या परिसरातील देवनार कचराभूमीमुळे रहिवाशांना दमा आणि इतर आजार होत आहेत. त्यातच मोबाइल टॉवरमुळे अधिक गंभीर आजार होण्याची भीती रहिवाशांना आहे.
हेही वाचा…प्रवाशांची बॅग तपासणाऱ्या पोलिसांवर करडी नजर
गेल्या सहा वर्षांपासून रहिवाशी या अनधिकृत टॉवरबाबत पालिकेकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. मात्र या तक्रारींची दाखल घेण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील मनसेच्या चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी अनेकदा एम पूर्व कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आली आहेत. त्यावेळी अधिकाऱ्यांनी या टॉवरवर कारवाई करण्याचे अनेकदा त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र आद्यप एकाही टॉवरवर कारवाई झालेली नाही. कारवाई करण्यात आली नाही, तर पालिका कार्यालयाबाहेरच अनधिकृत मोबाइल टॉवरचे प्रदर्शन भरविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.