मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या रिक्षा थांब्याजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा-टॅक्सी चालक आपली वाहने उभी करतात. परिणामी याठिकाणी बेस्ट बस चालकांना वळसा घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आशा वाहनांवर तत्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई : आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह खुले करण्यासाठी अभाविपचे लाक्षणिक उपोषण
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील महत्वाचे रेल्वे स्थानक अशी कुर्ला रेल्वे स्थानकाची ओळख आहे. तेथे दिवस-रात्र प्रवाशांची गर्दी असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मॉलजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सी उभ्या राहत आहेत. त्याचा त्रास इतर रिक्षा टॅक्सी चालकांसह बेस्ट बस चालकांना सहन करावा लागत आहे. कुर्ला रेल्वे स्थानक बेस्ट आगार बाजूलाच असल्याने या आगारातून बाहेर येताना आणि आगारात जाताना बस चालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. सध्या कुर्ला आगारातून गोवंडी-शिवाजी नगर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक वातानुकूलित मोठी बस सुरू करण्यात आली आहे. इतर बसपेक्षा ही बस मोठी आहे. अनधिकृत पार्किंगमुळे या बस चालकांना बस वळवण्यात अडचणी येतात. अनेकदा तेथे अपघातही घडले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिकांसह सर्वच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आशा वाहनांवर कडक कारवाई करत, येथील रस्ते मोकळे करावेत अशी मागणी स्थानिकांची आहे.