सर्वोच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर महापालिकेने सायन, वडाळा, अँटॉप हिल, माटुंग्यातील पदपथावरील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात स्थानिक भाजप आणि शिवसेना नेते एकवटल्यामुळे या कारवाईत अनंत अडचणी येत आहेत. याआधी बोरीवलीतही अतिक्रमणाविरोधात कडक धोरण अवलंबणाऱ्या पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांना स्थानिक भाजप नेत्याचा विरोध पत्करावा लागला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर केल्या जाणाऱ्या पालिकेच्या ‘फ उत्तर’ विभाग परिसरातील पालिकेच्या अनधिकृत मंदिरांविरोधातील बेधडक कारवाईदरम्यानही स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे अटकाव होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या पदपथांवरील अनधिकृतरीत्या बांधकाम केलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पालिकेला दिले होते.
या पाडकामाला सायन विधानसभेचे भाजप आमदार कॅप्टन तमीळ सेल्वेन यांनी विरोध करण्यास सुरुवात केली असून विभागाचे साहाय्यक आयुक्त केशव उबाळे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. उबाळे यांना बडतर्फ करण्यासंबंधीचे निवेदनच आपण पालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले असल्याचे आमदार सेल्वेन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.