मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फूल बाजार परिसरात अतिक्रमण करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या दुकानांवर सलग दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेने निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईअंतर्गत एकूण ३० दुकाने शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फूल बाजार परिसरात पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण, तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, एफ उत्तर विभागाच्या वतीने निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या परिसरातील ५२ दुकानांवर गुरुवारीही निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. ही मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू ठेवून शुक्रवारी आणखी ३० दुकानांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यात अतिक्रमण झालेली १४ दुकाने होती. तर, उर्वरित दुकानांनी वाढीव बांधकाम करण्यात आले होते. सुमारे ६५ अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांच्या साहाय्याने ही कारवाई पूर्ण केली. यासाठी १ जेसीबी व अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. उप आयुक्त प्रशांत सपकाळे, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.