लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेच्या ए विभागातील साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या सुमारे २५ दुकानांवर महानगरपालिकेने बुधवारी निष्कासनाची कारवाई केली. मुख्य डाक कार्यालय व सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरात वाढीव जागा व्यापून अतिक्रमण केलेली दुकाने व फेरीवाल्यांवरही निष्कासन व जप्तीची कारवाई करण्यात आली.

साबू सिद्दिक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावर अनधिकृतरित्या व्यवसाय थाटून अतिक्रमण करण्यात आले होते. संबंधित बाब महापालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या निदर्शनास आली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिक्रमित व अनधिकृत दुकाने जमीनदोस्त करण्याचे नियोजन आखले. त्यानुसार सुमारे २५ अनधिकृत दुकाने निष्कासित करण्याची कार्यवाही मंगळवारी झाली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे २ निरीक्षक, ८ कामगार यांच्यासह १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस कॉन्स्टेबल यांनी मिळून ही कारवाई पूर्ण केली. एक जेसीबी, जप्त तसेच निष्कासित साहित्य वाहून नेणारे एक वाहन, एक पोलीस व्हॅन आदी वाहने या कारवाईसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

दरम्यान, मुख्य डाक कार्यालयाजवळ सुमारे १२ ते १३ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयालगतच्या गल्लीत सुमारे २० अनुज्ञप्ती प्राप्त व्यावसायिकांनी मंजूर जागेच्या पलीकडे वाढीव जागेवर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटल्याच्या तक्रारी देखील पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करुन वाढीव जागांवरची दुकाने जमीनदोस्त केली. तसेच, संबंधित दुकानांमधील साहित्य जप्त केले.