मुंबई : गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील मुंबई महानगरपालिकेच्या मैदानामध्ये अनधिकृतरित्या कौशल्य विकास केंद्र उभारण्यात आले असून या अनधिकृत बांधकामाबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने संबंधितांवर केवळ नोटीस बजावून कारवाईचा फार्स केला आहे. महानगरपालिकेने संबंधितांवर दोन नोटीस बजावल्या असून पहिली नोटीस बजावून पाच महिने लोटले तरी या केंद्रावर कारवाई झालेली नाही. परिणामी, महानगरपालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोवंडीमधील छत्रपती शाहू महाराज मनोरंजन मैदानात पाच हजार चौरस फूट जागेत बांधकाम करण्यात आले आहे. ही जागा सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करावी, असा अर्ज तत्कालीन नगरसेवक मोहम्मद सिराज यांनी २०१७ साली महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर लग्नकार्यासाठी नाममात्र शुल्कात ही जागा उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसिम आजमी यांच्या संस्थेने महानगरपालिकेकडे अर्ज करून संबंधित जागेत वाचनालय सुरू कारण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार २०१९ साली त्यांच्या नियाझ अहमद मायनॉरिटीज एज्युकेशन आणि वेल्फेअर ट्रस्टने येथे वाचनालय सुरू केले. मात्र, त्यानंतर वाचनालयाऐवजी तेथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची मागणी २०२२ मध्ये महानगरपालिकेकडे करण्यात आली. त्यालाही मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली. मात्र, पुढील काळात कौशल्य विकास केंद्रासाठी सुमारे १५०० चौरस फुटाचे वाढीव बांधकाम करण्यात आले. तसेच मैदानात उभारलेल्या कौशल्य विकास केंद्राला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने मंजुरी दिलेली नाही. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयात याबाबत तक्रार केली. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने २७ जुलै रोजी नियाझ अहमद मायनॉरिटीज एज्युकेशन आणि वेल्फेअर ट्रस्टवर पहिली नोटीस बजावली. मात्र, पालिकेला ट्रस्टकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने ६ नोव्हेंबर रोजी संबंधित ट्रस्टवर दुसरी नोटीस बजावली आणि १५ दिवसांत अनधिकृत बांधकाम हटविण्याचे निर्देश दिले. मात्र, आजही हे कौशल्य विकास केंद्र सुरू असून केवळ नोटीस बजावण्याव्यतिरिक्त महानगरपालिकेने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही.
हेही वाचा – आता सेंट जॉर्ज रुग्णालयातही यकृत प्रत्यारोपण शक्य
नियाझ अहमद मायनॉरिटीज एज्युकेशन आणि वेल्फेअर ट्रस्टतर्फे चालविण्यात येणारे वाचनालय आणि अभ्यास केंद्र केवळ २५ टक्के जागेत सुरू असून ७५ टक्के जागा कौशल्य विकास केंद्राने गिळंकृत केली आहे. त्यामुळे आता ट्रस्टला नोटीसा बजावण्याऐवजी संबंधित अनधिकृत बांधकाम हटवून पुन्हा तेथे वाचनालय सुरू करावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी फैयाज शेख यांनी केली आहे.
हेही वाचा – चुनाभट्टीतील ‘टाटानगर’ इमारत अखेर जमीनदोस्त; गिरणी कामगार मात्र वाऱ्यावर
छत्रपती शाहू महाराज मनोरंजन मैदानातील वाचनालय आणि कौशल्य विकास केंद्राच्या भाड्यापोटी दर महिन्याला मुंबई महानगरपालिकेला २५ हजार रुपये देण्यात येतात. तसेच कौशल्य विकास केंद्रासाठी कोणतेही वाढीव बांधकाम करण्यात आलेले नाही. मैदानात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप पूर्णतः खोटा असून केवळ निवडणूक जवळ आल्यामुळे विरोधक बदनामी करीत आहेत. महानगरपालिकेने जागेचे मोजमाप करून याप्रकरणाची चौकशी करावी. – अबू आझमी, आमदार (समाजवादी पार्टी)