अस्वस्थ आठवलेंची काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीककेंद्रात व राज्यात सत्तेपासून दूर ठेवलेले रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले सध्या महायुतीत फारच अस्वस्थ आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधात आयोजित केलेल्या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर आठवले यांनीही हजेरी लावली. भाजपच्या काही धोरणांना विरोध करीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने आठवले यांना केंद्रात मंत्रीपद व राज्यात रिपाइंला सत्तेत योग्य वाटा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची वारंवार आठवण करुन देऊनही भाजपकडून त्याला दाद दिली जात नाही. त्यामुळे आठवले सध्या महायुतीत कमालीचे अस्वस्थ आहेत. त्यांनी अलीकडेच पक्षाचे अधिवेशन घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले. आता त्यांनी भाजपच्या काही धोरणांना जाहीर विरोध दर्शविला आहे.
 सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा विरोध असतानाही भाजपने जैतापूर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारच असा निर्धार केला आहे. त्याचवेळी रामदास आठवले यांनी त्या प्रकल्पाला आपल्या पक्षाचा विरोध असल्याचे जाहीर केले आहे. गोवंश हत्याबंदी कायाद्याबाबतही त्यांनी उघड विरोधाची भूमिका घेतली आहे.

Story img Loader