मुंबई : तापमानातील बदलांमुळे रुळांच्या दुरूस्तीसाठी मध्यरेल्वेने अघोषित ब्लॉक घेतल्याने गुरूवारी लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. प्रवाशांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वेळापत्रकामध्ये अनेक बदल करण्यात आले. गाड्या अर्धा ते पाऊण तास उशीरा धावत होत्या तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या काहिली इतकाच रेल्वेच्या कारभाराचाही मनस्ताप सहन करावा लागला.
हेही वाचा >>> मुंबई : प्राण्यांच्या दहनभट्टीत महिन्याभरात १७१ प्राण्यांवर अंत्यसंस्कार
मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावरून दररोज हजारोच्या संख्येने लोकल फेऱ्या धावतात. रेल्वे रुळाची दुरुस्ती करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन रेल्वे रुळांसाठी धोकादायक असते. त्यामुळे रेल्वे रुळांचा काही भाग दबला जातो. काही वेळा रेल्वे रुळाला तडा जातो. रुळांची दुरुस्ती करण्यासाठी अघोषित ब्लॉक घेतला जातो. गुरुवारी दुपारी १.५० वाजेपासून ते दुपारी २.२० असा ३० मिनिटांचा घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान धीम्या डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला. तर, दुपारी १.४५ ते दुपारी २.१० वाजता असा ३० मिनिटांचा माटुंगा ते शीव दरम्यान जलद मार्गावर ब्लॉक होता. हार्बर मार्गावर दुपारी १.०२ ते दुपारी १.२० वाजेपर्यंत १८ मिनिटांचा वाशी-मानखुर्द अप मार्गावर ब्लॉक होता. या ब्लॉकमुळे लोकल वेळापत्रक बिघडले. परिणामी प्रवाशांना इच्छित ठिकाणी प्रवास करण्यास विलंब झाला.
हेही वाचा >>> चेंबूरमधील बंद केलेल्या सिमेंट प्रकल्पाला पुन्हा परवानगी दिल्याने रहिवासी संतप्त
दरम्यान, मध्य रेल्वेने अघोषित ब्लॉकची प्रत्येक स्थानकात घोषणा करावी. फक्त लोकल उशिराने धावत आहेत, असे न सांगता ब्लॉकची पूर्ण माहिती द्यावी. त्यामुळे प्रवासी पुढील प्रवासाचे नियोजन करू शकतील, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.