वयापेक्षा मोठय़ा दिसणाऱ्या १२ वर्षांखालील मुले बेस्टच्या बसमधून प्रवास करताना त्यांच्या वयाबाबत अनेकदा बसवाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होतात. या पाश्र्वभूमीवर त्यावर तोडगा म्हणून अशा मुलांनी प्रवास करताना सोबत जन्मतारखेची प्रत ठेवावी, असे आवाहन बेस्टने केले आहे.
बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या १२ वर्षांखालील मुलांना भाडय़ात सवलत आहे. मात्र थोराड बांध्याच्या मुलांच्या वयाचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे बसवाहक आणि मुले अथवा त्यांचे पालक यांच्यात वाद उद्भवतात. या संदर्भात अनेक प्रवाशांनी बेस्ट प्रशासनाकडे बसवाहकाविरुद्ध तक्रारीही केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये अशा तक्रारींची संख्या वाढल्यामुळे बेस्ट उपक्रमाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. वयापेक्षा मोठय़ा दिसणाऱ्या १२ वर्षांखालील मुलांनी सवलतीच्या तिकिटाचा लाभ घेण्यासाठी सोबत जन्मतारखेचा पुरावा ठेवावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे.