मंत्रिपदावर असताना खासगी कंपन्यांशी असलेल्या संबंधांवरून राज्यातील युती सरकारमधील मंत्र्यांवर टीका होऊ लागल्यामुळे आता एकामागून एक मंत्र्यांनी खासगी पदांचा त्याग करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनीही खासगी पदांचे राजीनामे दिले आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे.
महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, जलसंधारण आणि रोजगार हमी योजना या खात्यांचा कारभार पाहणाऱ्या पंकजा मुंडे या त्यांच्या लग्नानंतरच्या नावाने (पंकजा पालवे) किमान पाच कंपन्यांच्या संचालक मंडळावर होत्या. दिल्ली येथील रिद्धी सिद्धी शेअर्स प्रा.लि. (२००७पासून संचालक), पुणे येथील सुप्रा मीडिया प्रा.लि. (२०१३ पासून संबंधित) व ठाणे येथील नंदगोपाल मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स (२०१४पासून संचालक) यांचा त्यात समावेश आहे. यापैकी दोन कंपन्यांच्या  संचालक पदांचे राजीनामे त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर आणखी तीन कंपन्यांमधील पदांचेही राजीनामे आपण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे मे २००९ मध्ये सुरू झालेल्या इच्छापूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालक मंडळावर आहेत. मंत्रिपदावर असताना गृहनिर्माण क्षेत्रातच कार्यरत असलेल्या एका फर्ममध्ये संचालक मंडळावर असल्याने त्यांनीही आपल्या या पदाचा राजीनामा दिला असून, तसे संबंधित कंपनीला कळवले आहे.
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या टेलिमॅटिक इंटरअ‍ॅक्टिव्ह प्रा. लि.चे संचालक आहेत. सप्टेंबर २०१२ मध्ये सुरू झालेली ही कंपनी बायोमेट्रिक रीडर्स, फॅक्स यंत्रे आणि टेहळणी कॅमेरे यांचा पुरवठा करते. गेल्या महिन्यातच चंद्रकांत पाटील यांनी या कंपनीतील संचालकपदाचा राजीनामा दिला.
मंत्रिपद घेऊन कार्यभार स्वीकारल्यापासून दोन महिन्यांच्या आत कुठल्याही उद्योगाचे व्यवहार आणि व्यवस्थापन यांच्याशी असलेले संबंध (मालकी हक्क सोडण्याव्यतिरिक्त) तोडून टाकावेत, असे केंद्र सरकारने मंत्र्यांसाठी तयार केलेल्या आचारसंहितेत नमूद केले आहे. मंत्री आपले हितसंबंध, अगदी मालकी आणि व्यवस्थापन यांचेही पती-पत्नीशिवाय कुठल्याही प्रौढ नातेवाईकाला हस्तांतरित करू शकतो, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा